पायांखाली जमिनीला बसत होते हादरे, पण त्यांचं काम थांबलं नाही… भूकंपाचे धक्के बसत असतानाही डॉक्टरांनी केली सर्जरी – Video

| Updated on: Mar 22, 2023 | 9:24 AM

Earthquake : काश्मीरपासून ते दिल्ली-एनसीआरसह संपूर्ण उत्तर भारतात भूकंपाचे जोरदार धक्के जाणवले. या दरम्यान लोक घाबरून घराबाहेर पडले. मात्र अशा परिस्थितीतही काही लोक त्यांचे काम इमानेइतबारे करत होते.

पायांखाली जमिनीला बसत होते हादरे, पण त्यांचं काम थांबलं नाही... भूकंपाचे धक्के बसत असतानाही डॉक्टरांनी केली सर्जरी - Video
Image Credit source: @cmo_anantnag
Follow us on

नवी दिल्ली : दिल्ली-एनसीआरसह (Delhi NCR) देशभरातील अनेक राज्यांमध्ये मंगळवारी रात्री भूकंपाचे (earthquake) धक्के जाणवले. भूकंपाचा प्रभाव जम्मू-काश्मीरमध्येही जाणवला. मीडिया रिपोर्ट्सनुसार, सुमारे 40 सेकंदांपर्यंत जमीन हादरत राहिली. या दरम्यान लोकांमध्ये घबराट (people scared) पसरली आणि घाईघाईने ते घरातून बाहेर पडले. या भूकंपाचं केंद्रस्थान अफगाणिस्तान असल्याची माहिती मिळत आहे. भूकंप जाणवल्याने नागरिकांची मोठी गर्दी रस्त्यावर जमा झाली होती. पण या सर्वांमध्येही काही लोक असे होते की जे स्वतःचा जीव वाचवण्यासाठी धावण्याऐवजी दुसऱ्याचा जीव वाचवण्याचे (saved others life) काम करत राहिले. आता या घटनेचा एक व्हिडिओ व्हायरल होत आहे.

हो, ही घटना जम्मू-काश्मीरमधील अनंतनाग येथील आहे. मंगळवारी रात्री जम्मू-काश्मीरमध्येही काही वेळासाठी भूकंपाचे जोरदार धक्के जाणवले. तेथे भूकंप झाला त्यावेळी बिजबेहारा येथील उपजिल्हा रुग्णालयात काही डॉक्टर ऑपरेशन करत होते. मात्र, त्याचवेळी भूकंपाचे जोरदार धक्के जाणवले, सर्व काही हलायला लागलं. असं असतानाही डॉक्टर आणि पॅरामेडिक्स टीमने त्यांची हिंमत न हारता त्यांचे काम सुरूच ठेवले. एवढेच नव्हे तर ऑपरेशन सुरू असतानाच काही वेळासाठी तेथे लाईटही गेले आणि ऑपरेशन थिएटरमध्ये मिट्ट काळोख पसरला. मात्र डॉक्टर व त्यांच्या सहकाऱ्यांनी त्यांचे धैर्य आणि तोल न गमावता शस्त्रक्रिया पुढे सुरूच ठेवली. या संपूर्ण घटनेचा व्हिडीओ सध्या व्हायरल झाला आहे. डॉक्टरांना देवाचं रुप का मानतात, ते या घटनेवरून खरंच दिसून आलं. सीएमओ अनंतनाग यांच्या ट्विटर अकाऊंटवरून एक व्हिडिओ शेअर केला आहे. त्यात हा सर्व घटनाक्रम दिसत आहे. या ट्विटसोबतच त्यांनी या शौर्याबद्दल डॉक्टरांच्या पथकाचे अभिनंदनही केले आहे.

हे सुद्धा वाचा

 

जाणवले भूकंपाचे तीव्र धक्के

खरंतर मंगळवारी रात्री उत्तर भारतात भूकंपाचे जोरदार धक्के जाणवले, त्यामुळे लोकांमध्ये घबराट आणि भीतीचे वातावरण पसरले. सुमारे ४० सेकंद भूकंपाचे धक्के जाणवले. यूएस जिओलॉजिकल सर्व्हिसेसच्या म्हणण्यानुसार, 6.5 तीव्रतेच्या या भूकंपाचा केंद्रबिंदू अफगाणिस्तानच्या हिंदुकुश प्रदेशापासून 40 किमी दक्षिण-पूर्वेला होता. भूकंप सुमारे 190 किमी खोलीवर झाला.

भूकंपाची तीव्रता किती ?

भारताच्या राष्ट्रीय भूकंप विज्ञान केंद्राने भूकंपाची तीव्रता रिश्टर स्केलवर 6.6 इतकी असल्याचे नमूद केले. मंगळवारी रात्री उशीरा काश्मीर ते दिल्ली-एनसीआरसह संपूर्ण उत्तर भारतात भूकंपाचे जोरदार धक्के जाणवले. लोक घाबरून घराबाहेर पडले होते.

दरम्यान या भूकंपानंतर दिल्लीच्या शक्करपूर मेट्रो पिलर 51 जवळ असलेली एक इमारत झुकल्याची माहिती मिळत आहे. दिल्ली-एनसीआर भागात बसलेले झटके सर्वात तीव्र होते, अशी प्राथमिक माहिती मिळत आहे. या घटनेनंतर मेट्रोची वाहतूक तात्पुरती स्वरुपात बंद करण्यात आली आहे. या घटनेमुळे एकच खळबळ उडाली आहे.