तुम्हाला या तरुणाची इच्छाशक्ती प्रेरणा दिल्याशिवाय राहणार नाही. ना-ना चा पाढा वाचणाऱ्यांसाठी ही तर एक प्रेरणादायी कथाच आहे. अनेकजण तंदुरुस्त असताना जे काम करु शकत नाहीत, ते हा तरुण हात नसताना करतो. एका दुर्घटनेत दोन हात गमावणाऱ्या या तरुणाच्या जिद्दीसमोर आकाश सुद्धा झुकले आहे. तामिळनाडू राज्यातील चेन्नई येथील दिव्यांग तानसेन याने अपंगत्वावर मात केली आहे. दोन्ही हात नसताना त्याला नुकताच वाहन परवाना (Driving License) मिळाले आहे.
या दुर्घटनेत गमावले दोन हात
तानसेन सध्या त्याच्या तिशीत आहे. तो दहा वर्षांचा असताना एक दुर्घटना घडली. वीजेच्या तारेला हात लागल्याने त्यात त्याला दोन हात गमवावे लागले. पण त्याने हार मानली नाही. त्याला वाहन चालविण्याची मोठी आवड होती. पण हात नसल्याने काय करावे या प्रश्नावर त्यानेच उत्तर शोधले. त्याने पायाने कार चालविण्याचा प्रयत्न केला.
मिळाले ड्रायव्हिंग लायसन्स
पायाने कार चालविण्यात तो पारंगत झाला. त्याने परिवहन विभागाकडे (RTO) कडे परवान्यासाठी अर्ज केला. त्यासाठीची परीक्षा आणि ट्रायल सुद्धा त्याने दिली. त्याला या 22 एप्रिल रोजी त्याचा वाहन परवाना देण्यात आला. ड्रायव्हिंग लायसन्स मिळविणारा तो तामिळनाडूतील पहिला दिव्यांग ठरला आहे. इतकेच नाही तर तो शिक्षणातही मागे नाही. त्याने पेरम्बूर येथून शिक्षण घेतले. आता तो LLM चे शिक्षण घेत आहे.
कुणाची मिळाली प्रेरणा
मध्यप्रदेशातील विक्रम अग्निहोत्री यांच्याकडून तानसेन याला प्रेरणा मिळाली. अग्निहोत्री यांचे पण दोन हात नव्हते. तरीही त्यांनी वाहन परवाना मिळवला होता. तर केरळमधील एक दिव्यांग जिलूमोल मॅरिएट थॉमस या महिलेने पण ड्रायव्हिंग लायसन्स मिळवले होते. या सर्व उदाहारणामुळे तानसेन याने मनाचा हिय्या केला. त्याला वाहन परवाना मिळाला.
कशी चालवितो कार
कार चालविण्यासाठी तानसेन याने पायांचा उपयोग केला. त्याने नवीन मारुती स्विफ्ट कार खरेदी केली. त्यात त्याने मॅकेनिककडून काय बदल करुन घेतले. त्यानंतर त्याने तीन महिने सातत्याने कार चालविण्याचा सराव आणि प्रशिक्षण पूर्ण केले. त्याचा उजवा पाय स्टिअरिंग व्हीलवर तर डावा पाय ब्रेक आणि एक्सिलेटरवर होता. तीन महिन्यानंतर त्याने आरटीओ जाऊन परीक्षा आणि ट्रायल दिली. आता वाहन परवाना मिळाल्याने त्याने आनंद व्यक्त केला.