रांची : प्रत्येकाच्या आयुष्यात प्रकाशाची उधळण करणारा सण म्हणजे दिवाळी. दिवे लावून दिवाळी साजरी केली आहे. मात्र, याच दिव्यांनी घात केल्याची घटना झारखंडमध्ये घडली आहे. ड्रायव्हर आणि कंडक्टर यांनी बसमध्ये दिवे लावले. मात्र, याच दिव्यांमुळे त्यांचे आयुष्य राख झाले आहे. बसने पेट घेतल्याने आगीत होरपळून या दोघांचा मृत्यू झाला आहे. दिवाळी दिवशी असं काही तरी घडेल याची या दोघांना कल्पनाही नव्हती. या घटनेमुळे हळहळ व्यक्त केली जात आहे.
झारखंडची राजधानी असलेल्या रांची शहरात ही घटना घडली आहे.रांची लोअर बाजार पोलीस स्टेशन हद्दीतील खडगर्हा बसस्थानकात ही थरारक घटना घडलेय. बसमध्ये झोपलेल्या ड्रायव्हर आणि कंडक्टरचा जळून मृत्यू झाला आहे.
ही बस नेहमीप्रमाणे मंगळवारी सकाळी आपल्या इच्छित स्थळी रवाना होणार होती. यामुळे ड्रायव्हर आणि कंडक्टर यांनी लक्ष्मीपूजनच्या दिवाळीच्या रात्री बसमध्ये पूजा केली.
देवाच्या मूर्तीची पूजा करुन त्यांनी बसमध्ये दिवे लावले. पूजा झाल्यावर दोघेही जवले आणि नेहमीप्रमाणे बसमध्ये झोपले. काही वेळातच त्यांना गाढ झोप लागली.
बसमध्ये लावेल्या दिव्याच्या ज्योतीने आग पेटली. काही मिनिटांतच संपूर्ण बस आगीच्या कचाट्यात सापडली.बसला चारही बाजूने आगीने वेढले.
आगीच्या झळांमुळे ड्रायव्हर आणि कंडक्टरला जाग आली. मात्र, बस पूर्णपणे पेटली अससल्याने त्यांना बसमधून बाहेर पडता आले नाही.
या घटनेत दोघेही जिवंत जाळले. या घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाचे पथक घटनास्थळी दाखल झाले.
मात्र, तोपर्यंत बस आगीत जळून खाक झाली होती. पोलिसांनी घटनास्थळ दोन्ही अर्धवट जळालेले मृतदेह बाहेर काढून शवविच्छेदनासाठी पाठवले आहेत.