Sugar Price : सणासुदीत साखर होणार कडू! 6 वर्षांत पहिल्यांदाच झाली महाग

| Updated on: Sep 05, 2023 | 7:06 PM

Sugar Price : केंद्र सरकारने साखर कारखान्यांना चालू हंगामात 30 सप्टेंबरपर्यंत 6.1 दशलक्ष मॅट्रिक टन साखर निर्यातीची मंजूरी दिली. गेल्या वर्षी कारखान्यांना रेकॉर्डब्रेक 11.1 दशलक्ष मॅट्रिक टन साखर निर्यातीची परवानगी देण्यात आली होती. यावर्षी साखरेच्या उत्पादनात मोठी घट आली आहे. त्यामुळे सणासुदीत साखर कडू होणार आहे.

Sugar Price : सणासुदीत साखर होणार कडू! 6 वर्षांत पहिल्यांदाच झाली महाग
Follow us on

नवी दिल्ली | 5 सप्टेंबर 2023 : देशात महागाई (Inflation) कमी होण्याचे कोणतेच संकेत मिळत नसल्याचे चित्र आहे. आरबीआय गव्हर्नर हे दावा करत असले तरी भाजीपाला, धान्य, डाळींच्या किंमती अजूनही गगनालाच भिडलेल्या आहेत. गेल्या 15 दिवसांत साखरेच्या किंमतीत जोरदार वाढ झाली आहे. साखरेची किंमत 3 टक्क्यांनी वाढली आहे. त्यामुळे किरकोळ बाजारात ग्राहकांच्या तोंडचे पाणी पळाले आहे. त्यांना ऐन सणासुदीच्या तोंडावर साखर महाग (Sugar Price Hike) मिळत आहे. साखर कडू झाल्याने सणासुदीत गोडवा कमी होणार एवढं मात्र नक्की. किरकोळ बाजारात साखरेचे भाव कमी होतील का? त्यावर नियंत्रण येईल का याविषयीचे धोरण सध्या तरी जाहीर करण्यात आलेले नाही. ऑक्टोबर 2017 नंतर साखरेच्या किंमती पहिल्यांदा सर्वाधिक वाढल्या आहेत. गेल्या 6 वर्षांत हे भाव सर्वाधिक वाढले आहेत.

किंमत भडकली

ऑक्टोबर 2017 नंतर पहिल्यांदा साखरेच्या किंमती गगनाला भिडल्या आहेत. मंगळवारी साखरेच्या किंमतींनी मोठा पल्ला गाठला. या किंमती वाढून 37,760 रुपये प्रति मॅट्रिक टनपर्यंत पोहचल्या. गेल्या 6 वर्षांतील हा उच्चांक आहे. त्याचा थेट परिणाम बाजारात दिसून आला. किरकोळ बाजारात किंमती वाढल्या. आता सणासुदीत या किंमती अजून वाढण्याची भीती आहे.

हे सुद्धा वाचा

कारण तरी काय

साखरेच्या किंमती वाढल्याने व्यापारी आणि उत्पादकांच्या चिंता वाढल्या आहेत. महाराष्ट्र आणि कर्नाटक या राज्यात कमी पावसाने ऊसाच्या शेतीला मोठा फटका बसला आहे. त्यामुळे ऊसाच्या उत्पादनाला फटका बसला. साखर कारखाने मोठे गाळप करु शकले नाहीत. चालू हंगामात, 2023- 24 मध्ये साखरेच्या उत्पादनात घट येण्याची भीती आहे. यामुळे साखरेच्या किंमती भडकण्याची भीती आहे. त्यामुळे महागाई कमी करण्याच्या केंद्र सरकारच्या धोरणांना फटका बसू शकतो.

महागाई पुन्हा डोक्यावर

1 ऑक्टोबरपासून साखरेचे उत्पादनाचा नवीन हंगाम सुरु होत आहे. कमी पावसामुळे यंदा बाजारात साखरेचा पुरवठा कमी असेल. साखरेच्या उत्पादनात 3.3% घसरण येऊ शकते. त्यामुळे साखरेचे उत्पादन घसरुन 31.7 दशलक्ष मॅट्रिक टनावर येईल. बाजारात मोठ्या प्रमाणात स्टॉक न आल्याने किंमती वाढतील.

किंमती वाढतील

साखरेच्या किंमतीत वाढ होण्याची भीती आहे. केंद्र सरकारने सध्या साखरेच्या निर्यातीवर बंद आणली आहे. किरकोळ बाजारात किंमती वाढू नये यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. पण मुळात साठाच जास्त नसल्याने, उत्पादन घसरल्याने किरकोळ बाजारात साठेबाज प्रभाव पाडू शकतात. साखरेच्या किंमती भविष्यात आणखी वाढण्याची शक्यता आहे.