नोएडा : ग्रेटर नोएडात काळजात धस्स करणारी घटना उघडकीस आली आहे. ग्रेटर नोएडाच्या अल्फा-2 सेक्टरच्या गोल्फ गार्डनिया सोसायटीत रात्री उशिरा लिफ्टमध्ये 8 लोक अचानक पहिल्या मजल्यावर अडकल्याची घटना घडली. अडकलेल्यांमध्ये बहुतांश लहान मुले होती. तब्बल दोन तास लिफ्टमध्ये संपूर्ण कुटुंब जीवन मरणाच्या दारात उभे होते. मात्र अग्नीशमन दलाने अथक प्रयत्नाने दोन तासानंतर कुटुंबाची लिफ्टमधून सुटका केली आणि सर्वांनी सुटकेचा निःश्वास सोडला.
गोल्फ गार्डनिया सोसायटीत दुष्यंत कुमार काल रात्री उशिरा आपल्या ओळखीच्या व्यक्तीची नवीन गाडी पहायला गेले होते. गाडी पाहून कुटुंबासह पहिल्या मजल्यावरील आपल्या घरी चालले होते. यासाठी ते इमारतीतील लिफ्टमध्ये शिरले, मात्र लिफ्ट वर न जाता मायनस पहिल्या मजल्यावर थांबली. यानंतर दुष्यंत कुमार यांनी बटण दाबून लिफ्ट पुन्हा सुरू करण्याचा प्रयत्न केला. परंतु लिफ्ट सुरु न झाल्याने 112 आपत्कालीन क्रमांकावर कॉल करण्यात आला. लिफ्टचा सायरनही बंद पडला होता.
सोसायटीच्या सुरक्षा कर्मचाऱ्यांनी लिफ्टमध्ये अडकलेल्या लोकांना बाहेर काढण्यासाठी खूप कसरत केली. मात्र त्यांना यश आले नाही. यानंतर अग्निशमन दलाला माहिती देण्यात आली. अग्निशमन दलाच्या पथकाने तात्काळ धाव घेत लोखंडी रॉडच्या सहाय्याने दोन तास अथक प्रयत्न करुन अडकलेल्या लोकांना बाहेर काढले.
अडकलेल्यां लोकांमध्ये 2 लहान मुले आणि एका वृद्धाचाही समावेश असल्याचे सांगण्यात येत आहे. सुदैवाने कोणत्याही प्रकारची जीवितहानी झालेली नाही. सर्व अडकलेल्या लोकांना बाहेर काढल्यावर लोकांनी सुटकेचा नि:श्वास सोडला. तांत्रिक बिघाडामुळे लिफ्ट बंद पडली असून, याबाबत बांधकाम व्यावसायिक आणि देखभाल कर्मचारी मात्र मौन बाळगून आहेत.