नवी दिल्ली : गेल्या काही दिवसांपासून प्रसिद्ध राजकीय रणनीतीकार प्रशांत किशोर (Prashant Kishor) हे काँग्रेसमध्ये प्रवेश करणार अशी चर्चा होत होती. दरम्यान प्रशांत किशोर यांनी दोन आठवड्यापूर्वी काँग्रेसच्या अध्यक्षा सोनिया गांधी (Sonia Gandhi), राहुल गांधी आणि प्रियंका गांधी यांची भेटही घेतली होती. त्यानंतर काँग्रेसच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांनी एक वरिष्ठ बैठक बोलावली होती ज्यात काँग्रेसचे जेष्ठ नेते होते. तर त्यावेळी 2024 ला होणाऱ्या निवडणूकिसंदर्भात रोडमॅप ही सादर केला होता. मात्र त्यानंतर असे काही झाले की, प्रशांत किशोर यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश आधीच काँग्रेसला रामराम केला आहे. तर काँग्रेसचे नेते रणदीप सुरजेवाला (Randeep surjewala) यांनी ट्विट करून याची माहिती देत प्रशांत किशोर यांच्या चर्चेंना पूर्णविराम दिला होता. त्यानंतर प्रशांत किशोर यांनी ही, आपण काँग्रेसमध्ये प्रवेश करणार नाही, असं स्पष्ट केले होते.
देशात सर्वात जुन्या असणाऱ्या पक्षाला सध्या घरघर लागली असतानाच निवडणूक रणनीतीकार प्रशांत किशोर यांनी आधार देण्याचा प्रयत्न केला होता. तर काँग्रेस पक्षात जाण्याची तयारी दाखवली होती. मात्र त्यांच्यासमोर काँग्रेसने सक्षम कृती गटाचा भाग म्हणून पक्षात सामील व्हा असा प्रस्ताव ठेवण्यात आला होता. तो न पटल्याने प्रशांत किशोर यांनी तो प्रस्ताव स्पष्टपणे नाकारला आहे. त्यामुळे प्रशांत किशोर यांच्या काँग्रेस पक्षाच्या प्रवेशाच्या चर्चेंना पूर्णविराम लागला आहे.
1. प्रशांत किशोर यांना मोठ्या धमाकेदार सुधारणा घडवून आणण्यासाठी मोकळा हात हवा होता. जो काँग्रेसला सोयीचा वाटला नाही. त्याऐवजी, पक्षाने त्यांना 2024 च्या निवडणुकीसाठी रणनीती आखण्याचे काम सोपवलेल्या समितीमध्ये स्थान देऊ केले.
2. काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी आणि त्यांची मुलगी आणि पक्षाच्या ज्येष्ठ नेत्या प्रियांका गांधी वड्रा यांनी किशोर यांना पाठिंबा दिला होता. मात्र त्यावर राहुल गांधी नाखूष असल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे.
3. 2014 च्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्रचाराची रचना आखणारे प्रशांत किशोर यांच्याबद्दल काँग्रेसकडे अविश्वासाचे मुद्दे होते.
4. काँग्रेसमधील एका वर्गाने किशोर यांच्या “वैचारिक” बांधिलकीचा अभाव असल्याचे नमूद केले होते. तर त्यांनी त्याचा संबंध तेलंगणाच्या सत्ताधारी पक्षाशी आयपीएसीच्या कराराकडे जोडला. मात्र किशोर यांचे आता IPAC या संस्थेशी कोणतेही औपचारिक संबंध नाहीत, ज्याची त्यांनी एकेकाळी स्थापना केली होती.
5. तर काँग्रेसमधील बदलांना पक्षातीलच दिग्गजांचा विरोध असल्याचेही सूत्रांनी सांगितले. तसेच प्रशांत किशोर यांनी जे मुद्दे मांडले होते त्यात नेतृत्व बदलाचा मुद्दा होता. ज्यामध्ये पक्षाची सर्वोच्च निर्णय घेणारी संस्था, कार्यसमितीसह प्रमुख संघनेतील बहुतेक नेत्यांचा समावेश होतो.