इंदूर : मध्य प्रदेशातील इंदूरमधील जुनी पोलीस स्टेशन हद्दीतील बेलेश्वर मंदिरात गुरुवारी दुपारी एक मोठी दुर्घटना घडली. हवन आणि पूजा सुरू असताना अचानक मंदिरातील विहिरीवरील आच्छादन कोसळले. या अपघातात 11 जणांचा मृत्यू झाला आहे, तर 19 जणांना बाहेर काढण्यात आले आहे, अशी माहिती इंदूरचे जिल्हाधिकारी डॉ. इलैयाराजा टी. यांनी दिली. पोलीस आणि एसडीआयआरएफचे पथकाकडून बचाव कार्य सुरु आहे. घटनास्थळी पोहोचलेल्या पोलीस आणि प्रशासनाच्या अधिकाऱ्यांच्या देखरेखीखाली अडकलेल्या सर्व लोकांना बाहेर काढण्याचे प्रयत्न सुरू आहेत. या घटनेबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्विट करत शोक व्यक्त केला आहे.
इंदूरमधील दुर्घटनेने अत्यंत दु:ख झाले आहे. मुख्यमंत्री @ChouhanShivraj जी यांच्याशी बोललो आणि परिस्थितीची माहिती घेतली. राज्य सरकार जलद गतीने बचाव आणि मदत कार्य करत आहे. सर्व पीडित आणि त्यांच्या कुटुंबियांसोबत माझी प्रार्थना आहे.
Extremely pained by the mishap in Indore. Spoke to CM @ChouhanShivraj Ji and took an update on the situation. The State Government is spearheading rescue and relief work at a quick pace. My prayers with all those affected and their families.
— Narendra Modi (@narendramodi) March 30, 2023
गुरूवारी सकाळी मंदिरात हवन पूजेचा कार्यक्रम सुरू होता. या कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी अनेक भाविक मंदिरात उपस्थित होते. अचानक झालेल्या अपघातामुळे त्यांच्यापैकी कुणालाही सावरण्याची संधी मिळाली नाही. दरवर्षी रामनवमीनिमित्त मंदिरात भव्य कार्यक्रम आयोजित केला जातो. यंदाही मंदिरात यज्ञ केला जात होता. यामध्ये सहभागी होण्यासाठी मोठ्या संख्येने लोक मंदिरात दाखल झाले. अशा स्थितीत मंदिराची इमारत एवढ्या लोकांचा भार सहन करू शकली नाही.
अपघाताची माहिती मिळताच स्थानिक आमदार आकाश विजयवर्गीय आणि माजी मंत्री जितू पटवारी घटनास्थळी दाखल झाले. मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी दुर्घटनेनंतर डीएम आणि आयुक्तांशी फोनवर चर्चा केली आणि अडकलेल्या भाविकांना लवकरात लवकर बाहेर काढण्याच्या सूचना दिल्या.