कुलगाम | 17 नोव्हेंबर 2023 : जम्मू-कश्मीरात अतिरेक्यांना भारतीय लष्कर आणि स्थानिक पोलिस सातत्याने कंठस्नान घालत आहेत. कुलगाम येथे झालेल्या एन्काऊंटरमध्ये शुक्रवारी पाच अतिरेकी ठार झाल्यानंतर राजौरीमध्येही एक अतिरेकी ठार झाला आहे. आता त्यानंतर राजौरीमध्ये देखील अतिरेक्यांचे एन्काऊंटर सुरु आहे. येथेही अनेक अतिरेकी लपल्याची शक्यता आहे. जम्मू- कश्मीरमध्ये 24 तासांत दोन एन्काऊंटर सहा अतिरेकी ठार झाल्याने अतिरेक्यांचे धाबे दणाणले आहेत.
भारतीय लष्कराला मिळालेल्या गुप्त माहितीनूसार ऑपरेशन सुरु केले आहे. जम्मू-कश्मीरातील कुलगाम येथे रात्रभर झालेल्या चकमकीत पाच अतिरेकी ठार झाले. त्यानंतर राजौरी येथे ही अतिरेक्यांचे एन्काऊंटर होऊन एक अतिरेकी ठार झाला असून आणखी अतिरेकी येथे लपल्याचा संशय आहे. 16 नोव्हेंबरच्या सायंकाळी कुलगामच्या सामनू भागात दहशतवादी लपल्याची माहिती सुरक्षा दलांना मिळाली होती. ही शोध मोहिमे सुरु असताना सुरक्षा दलाच्या सैनिकांवर दहशतवाद्यांनी गोळीबार केला. सुरक्षा दलांनीही प्रत्युत्तर दिले. लष्कराचे 34व्या राष्ट्रीय रायफल्स, 9 पॅरा (एलिट स्पेशल फोर्स युनिट), सीआरपीएफ आणि राज्य पोलीस या कारवाईत सहभागी झाले होते. या कारवाईत लष्कर- ए – तोयबाचे पाच अतिरेकी ठार झाले.
कुलगाम येथील चकमकीत ठार झालेला 16 वर्षांचा अतिरेकी अनंतनागमधील वानपोहचा रहीवासी आहे. त्याने सहावीला असताना नवोदय प्रवेश परीक्षेची जोरदार तयारी सुरु केली होती. नवोदय प्रवेश परीक्षेतही तो अव्वल ठरला होता. त्याच्या वडिलांनी त्याला दिल्ली पब्लिक स्कूलसारख्या महागड्या शाळेत दाखल केले होते. जेव्हा त्याच्या काकांना एन्काउंटरची माहिती मिळाली तेव्हा त्यांनी राजधानी श्रीनगरमधील पोलिस मुख्यालय गाठले आणि आपल्या भाच्याचा शेवटचे दर्शन घेतले. त्याच्या पालकांनाही मुलाचा चेहरा पाहायचा होता. परंतू कश्मीरमध्ये दहशतवाद्यांचे मृतदेह त्यांच्या कुटुंबीयांकडे सोपवणे बंद केले आहे. अवघ्या 14-15 वर्षांचा आणि एके दिवशी अचानक पिकनिकला जातोय असं सांगून घरातून तो निघून गेला ते परत आलाच नसल्याचे त्याच्या काकांनी सांगितले.