शेतकऱ्यांसाठी नोकरीवर लाथ ते जेलवारी, वाचा मोदी सरकारला जेरीस आणणारे राकेश टिकैत कोण आहेत?

| Updated on: Jan 29, 2021 | 9:19 AM

तकरी आंदोलनाचा प्रमुख चेहरा बनलेल्या शेतकरी नेते राकेश टिकेत यांचा संघर्ष मोठा आहे. | Farmer Leader Rakesh tikait Profile Information

शेतकऱ्यांसाठी नोकरीवर लाथ ते जेलवारी, वाचा मोदी सरकारला जेरीस आणणारे राकेश टिकैत कोण आहेत?
rakesh tikait
Follow us on

नवी दिल्ली : शेतकरी आंदोलनाचा प्रमुख चेहरा बनलेल्या शेतकरी नेते राकेश टिकैत यांचा संघर्ष मोठा आहे. पहिल्यांदा कायद्याचा अभ्यास नंतर शेतकऱ्यांना न्याय हक्क मिळवून देण्यासाठी पोलिसाची नोकरी सोडली. नंतर शेतकऱ्यांच्या पाठिंब्यावर निवडणुकीला सामोरे गेले. बळीराजाला न्याय मिळवून देण्यासाठी तसंच आंदोलनाचं प्रमुख अस्त्र वापरून त्यांनी कितीतरी विद्यमान सरकारांना धारेवर धरलं. या सगळ्यांत त्यांना 44 वेळा जेलवारी झाली. (Farmer Leader Rakesh tikait Profile Information Farmer protest Tractor Ralley New Delhi)

कोण आहेत राकेश टिकैत

शेतकरी नेते असलेले महेंद्रसिंग टिकैत यांचे ते पुत्र आहेत. राकेश टिकेत यांचा जन्म मुजफ्फरनगरच्या सिसोली गावात झाला. शेतकऱ्यांच्या न्याय हक्कांसाठी लढणारा नेता, आंदोलन करणारा नेता अशी त्यांची ओळख… ते सध्या भारतीय किसान युनियनची जबाबदारी सांभाळत आहेत. या संघटनेचे राष्ट्रीय प्रवक्ता म्हणूनही ते काम पाहतात. या संघटनेचं प्रस्थ उत्तर प्रदेशसहित उत्तर भारतात मोठ्या प्रमाणावर आहे.

कायद्याचा अभ्यास ते शेतकरी नेते…

राकेश टिकैत यांनी मेरठ विद्यापीठातून एमए केले आहे. त्यांनी लॉ एलएलबीचा अभ्यासही केला आहे. 1992 साली त्यांनी दिल्ली पोलिसमध्ये त्यांनी काम केले.

1993-1994 मध्ये वडील महेंद्रसिंग टिकैत यांच्या नेतृत्वात दिल्लीतील लाल किल्ल्यावर शेतकरी आंदोलन सुरू होते. हे आंदोलन संपवण्यासाठी सरकारने त्यांच्यावर दबाव आणताना सांगितले की त्यांनी त्यांच्या वडिलांना व भावंडांना आंदोलन थांबविण्यास सांगावे. अशा परिस्थितीत राकेश टिकैत यांनी शेतकऱ्यांची बाजू घेत पोलिसाची नोकरी सोडली. राकेश टिकैत यांनी नोकरी सोडून भारतीय शेतकरी संघासह शेतकरी संघर्षात सक्रिय झाले. कर्करोगाने वडील महेंद्रसिंग टिकैत यांच्या निधनानंतर त्यांनी भारतीय किसान युनियनची (बीकेयू) जबाबदारी सांभाळली.

निवडणुकीत दोनदा पराभूत

15 मे 2011 रोजी वडील महेंद्रसिंग टिकैत यांच्या दीर्घ निधनानंतर मोठा मुलगा नरेश टिकैत यांना युनियनचे अध्यक्ष बनविण्यात आले. त्याचवेळी राकेश टिकैत देखील सक्रियपणे कार्यरत होते. यापूर्वी त्यांनी राजकारणातही आपलं नशीब आजमावलं. 2007 मध्ये प्रथमच त्यांनी मुझफ्फरनगरमधील खतौली विधानसभा मतदारसंघातून अपक्ष म्हणून निवडणूक लढविली. या निवडणुकीत त्यांना पराभवाचा सामना करावा लागला. 2014 लोकसभेला राष्ट्रीय लोकदल पक्षाने त्यांना अमरोहा जिल्ह्यातून तिकीट दिले. पण लोकसभा निवडणुकीतही त्यांचा पराभव झाला.

शेतकऱ्यांसाठी 44 वेळा जेलवारी

राकेश टिकैत हे शेतकरी लढ्यात 44 वेळा तुरुंगात गेले आहेत. एकदा मध्य प्रदेशात भूसंपादन कायद्याच्या विरोधात त्यांना 39 दिवस तुरुंगात रहावे लागले. यानंतर त्यांनी दिल्लीतील संसद भवनाच्या बाहेर उसाला आधारभूत किंमत वाढविण्याच्या मुद्द्यावरुन सरकारविरोधात निदर्शने केली. यानंतर त्यांना तिहार तुरुंगात पाठविण्यात आले. राजस्थानमध्येही एकदा शेतीमालाच्या बाजार भावावरुन त्यांनी एकदा निदर्शने केली. यावेळी त्यांना जयपूर कारागृहात जावे लागले.

हे ही वाचा :

शेतकऱ्यांविरुद्ध जगातील सर्वात मोठं षडयंत्र सुरु; राकेश टिकैतांचा आरोप

‘कृषी कायदे परत घेतले नाही, तर आत्महत्या करेन,’ शेतकरी नेते राकेश टिकैत यांचा इशारा