नवी दिल्ली : केंद्र सरकारच्या कृषी कायद्याविरोधात राजधानी दिल्लीच्या सीमेवर सुरु असलेल्या शेतकरी आंदोलनाचा आज 77वा दिवस आहे. या पार्श्वभूमीवर बुधवारी संयुक्त मोर्चाने एक मोठी घोषणा केली आहे. प्रजासत्ताक दिनाला टॅक्टर रॅलीदरम्यान झालेल्या हिंसाचारानंतर काहीसे शांत झालेले शेतकरी पुन्हा आक्रमक होताना दिसत आहेत. कारण 18 फेब्रुवारीला 4 तास रेल्वे रोको करण्याची घोषणा संयुक्त किसान मोर्चाने केली आहे.(Announcement of Sanyukta Kisan Morcha of Rail Roko on 18th February)
12 फेब्रुवारीला राजस्थानमध्ये टोल घेऊ दिला जाणार नाही. तर 18 फेब्रुवारीला देशभरात दुपारी 12 वाजेपासून ते संध्याकाळी 4 वाजेपर्यंत रेल्वे रोको केला जाईल, अशी घोषणा संयुक्त किसान मोर्चाकडून करण्यात आली आहे. त्यामुळे दिल्लीच्या सीमेवर रस्त्यांवर ठाण मांडून बसलेले शेतकरी आता रेल्वे रुळावर उतणार असल्याचं स्पष्ट झालंय.
इतकच नाही तर 14 फेब्रुवारीला पुलवामा हल्ल्यात शहीद झालेल्या जवानांना अभिवादन करण्यासाठी देशभरात कँडल मार्च, मशाल मोर्चे आणि अन्य कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं आहे. तर 16 फेब्रुवारीला शेतकरी नेते सर छोटूराम यांच्या जयंती दिनी देशभरातील शेतकरी एकजूट दाखवतील, अशी घोषणाही संयुक्त किसान मोर्चानं केली आहे.
केंद्र सरकारच्या कृषी कायद्याविरोधात गाझीपूर सीमेवर सुरु असलेलं शेतकरी आंदोलन महात्मा गांधी जयंती अर्थात 2 ऑक्टोबरपर्यंत सुरु राहणार असल्याची घोषणा करण्यात आली आहे. भारतीय किसान युनियनचे नेते राकेश टिकैत यांनी 6 फेब्रुवारीला ही मोठी घोषणा केली आहे. राजधानी दिल्लीच्या सीमेवर गेल्या 73 दिवसांपासून शेतकरी आंदोलन सुरु आहे. केंद्र सरकार आणि शेतकरी नेत्यांमध्ये चर्चेच्या अनेक फेऱ्या होऊनही या प्रश्नावर अद्याप तोडगा निघू शकलेला नाही. अशा स्थितीत गाझीपूर सीमेवर सुरु असलेलं शेतकरी आंदोलन 2 ऑक्टोबरपर्यंत सुरु राहणार असल्याची घोषणा करण्यात आली आहे.
दिल्ली आणि उत्तर प्रदेशाची सीमा असलेल्या गाझीपूर सीमेवरील आंदोलनाचं नेतृत्व राकेश टिकैत करत आहेत. केंद्र सरकार तिनही कृषी कायदे रद्द करेल तेव्हाच आंदोलक शेतकरी आपल्या घरी परततील असं टिकैत यांनी यापूर्वीही स्पष्ट केलं आहे. आता मात्र 2 ऑक्टोबरपर्यंत हे आंदोलन सुरुच राहणार असल्याची घोषणा त्यांनी केली आहे.
संबंधित बातम्या :
नरेंद्रसिंह तोमर भडकले; राज्यसभेत म्हणाले काँग्रेसला रक्तापासून शेती करायचीय
Announcement of Sanyukta Kisan Morcha of Rail Roko on 18th February