भोपाळ : महिला कर्मचाऱ्यांसाठी मोठी खुशखबर (Good News) आहे. महिला कर्मचाऱ्यां (Women Employee)ना तिसऱ्यांदा माता झाल्यावर मॅटर्निटी लिव्ह (Maternity Leave) अर्थात प्रसूती रजा देण्याचा मार्ग मध्य प्रदेशच्या हायकोर्टाने मोकळा केला आहे. एखाद्या महिलेने पुनर्विवाह केल्यास गर्भधारणा झाल्यास तिला प्रसूती रजेचा लाभ देण्यात यावा, असा निर्णय न्यायालयाने दिला आहे. जरी तिला आधीच दोनदा प्रसूती रजा मिळाली असेल, तरी ती तिसऱ्यांदा प्रसूती रजेसाठी हकदार ठरते, असे न्यायालयाने आपल्या निकालपत्रात म्हटले आहे.
जबलपूर जिल्ह्यातील पौरी कलान गावातील प्राथमिक शाळेच्या शिक्षिका प्रियंका तिवारी यांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. याचिकेत त्यांनी न्यायालयाला सांगितले की, तिचे पहिले लग्न 2002 मध्ये झाले आणि 2018 मध्ये घटस्फोट झाला. त्यानंतर 2021 मध्ये तिने पुन्हा लग्न केले आणि आता ती गर्भवती आहे. परंतु सध्याच्या नियमानुसार केवळ दोनदा प्रसूती रजेची तरतूद आहे. यामुळे ती तिसऱ्यांदा प्रसूती रजा घेऊ शकत नाही. मात्र जर महिला कर्मचाऱ्याने घटस्फोटानंतर पुनर्विवाह केला असेल तर तिला पुन्हा प्रसूती रजा मिळायला हवी, असा दावा प्रियंका यांनी याचिकेतून केला आहे. तिच्या याचिकेवर सरन्यायाधीश रवी विजय कुमार मलीमथ आणि न्यायमूर्ती पी.के. कौरवांच्या खंडपीठाने सुनावणी केली.
याचिकाकर्त्या शिक्षिका प्रियंका तिवारी यांनी आपल्या याचिकेसोबत हरियाणा उच्च न्यायालयाच्या आदेशाची प्रत सादर केली होती. मात्र आपल्या अर्जावर राज्य सरकारने अद्याप प्रतिसाद दिलेला नाही, असे प्रियंका यांनी न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिले. परिस्थितीची निकड लक्षात घेऊन उच्च न्यायालयाने याचिकाकर्त्या शिक्षिकेला मोठा दिलासा दिला. न्यायालयाने अंतरिम आदेशात शालेय शिक्षण विभागाला प्रियंका तिवारीला तिसऱ्यांदा प्रसूती रजा देण्याबाबत सूचना केल्या.
15 जून 2018 रोजी जारी करण्यात आलेल्या राजपत्रानुसार महिला कर्मचाऱ्यांना 180-180 दिवसांची प्रसूती रजा दोनदा देण्याची तरतूद आहे. कर्मचाऱ्याची इच्छा असेल तर ही रजा तुकड्यांमध्येही घेता येईल. या दरम्यान कर्मचाऱ्यांना पगारासह सर्व फायदे दिले जातात. मात्र घटस्फोटानंतर केलेल्या पुनर्विवाहात पुन्हा प्रसूती रजेचा लाभ घेण्यास महिला कर्मचारी हकदार ठरत असल्याचा महत्वपूर्ण निर्वाळा मध्य प्रदेश उच्च न्यायालयाने दिला आहे. या निकालाने महिला कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.