नवी दिल्लीः उत्तर प्रदेशची राजधानी लखनऊमधील (Lucknow) एका हॉटेलमध्ये भीषण आग लागून दोघांचा मृत्यू (Two Death) झाला असून काही लोकं हॉटेलमध्येच अडकली आहेत. ही घटना हजरतगंज भागात घडली असून आग लागलेल्या हॉटेलचे नाव लेवाना हॉटेल (Levana Hotel) आहे. हॉटेलला आग लागल्यानंतर हॉटेलच्या खोल्यांमधून अडकलेल्या लोकांना बाहेर काढण्याचे प्रयत्न अग्निशमन दलाकडून सुरू करण्यात आले आहेत. आग विझविण्यासाठी अग्निशमन दलाच्या 3 घटनास्थळी दाखल झाल्या असून अग्निशमन दलाने आता 40 लोकांपैकी 18 लोकांना बाहेर काढण्यात आले आहे. हॉटेलमध्ये 30 खोल्या होत्या, त्यामध्ये सुमारे 35-40 लोकं अडकल्याची शंका व्यक्त केली गेली होती. त्यापैकी 18 लोकांना बाहेर काढण्यात आले असून जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
आगीत जखमी झालेल्या नागरिकांची भेट घेण्यासाठी मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी रुग्णालयाला भेट दिली आहे.
घटनास्थळावरुन मिळालेल्या माहितीनुसार हॉटेलच्या तिसऱ्या मजल्यावर आग लागली होती. त्यानंतर हॉटेलमधील वेगवेगळ्या खोल्यांमध्ये अडकलेल्या 18 लोकांना बाहेर काढण्यात आले आहे. तर यामध्ये जखमी झालेल्या नागरिकांनाही रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आले असून उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी जखमींची भेट घेतली आहे. हॉटेलच्या चौथ्या मजल्यावर अडकलेल्या लोकांनाही बाहेर काढल्यामुळे मोठा अनर्थ टळल्याचे अग्निशमन दलाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.
हॉटेलला लागली ही आग शॉर्टसर्किटमुळे लागली असल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. हे हॉटेल चार मजली असून आग लागल्यानंतर जिन्यावरुन नागरिकांनी बाहेर आल्याने त्यांचे जीव वाचले आहेत. आगीने रौद्ररुप धारण केल्यानंतर मात्र तिसऱ्या मजल्यावर अडकलेल्या लोकांना हॉटेलचे छत तोडून अग्निशमन दलाने बाहेर काढले आहे.
हॉटेलमध्ये आग लागल्यानंतर कॉरिडॉरमध्येच मोठ्या प्रमाणात धूर पसरला होता. या हॉटेलमधी खोली क्रमांक 214 मध्ये एक कुटुंब अडकल्याचे सांगण्यात येत असून त्यातील दोघं जण बेशुद्ध पडल्याचेही सांगण्यात येत आहे. सकाळी 6 वाजता हॉटेलमधून धूर बाहेर येत असल्याचे लक्षात येताच आग लागल्याचे स्पष्ट झाले. हॉटेलमधील 30 खोल्यांपैकी 18 खोल्या बुक करण्यात आल्या होत्या, त्यामुळे आता प्रत्येक खोलीचे दार तोडून तपासणी करण्याचे काम सुरु आहे.