छत्तीसगड | 10 डिसेंबर 2023 : रस्ते अपघातात दरवर्षी अनेक जीव हकनाक जात आहेत. यासाठी मानवी चुकासोबतच रस्त्याचे बांधकाम देखील जबाबदार असते. आता छत्तीसगडच्या जांजगीर-चांपा जिल्ह्यात रविवारी सकाळी भीषण अपघात झाल्याचे उघडकीस आले आहे. लग्नावरुन परतणाऱ्या एका कारला ट्रकने जोरदार ठोकर दिल्याने झालेल्या भयंकर अपघातात कारचा चक्काचूर होऊन आत बसलेले नवरा आणि नवरीसह पाच जणांचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. ही कार रामगडहून अकलतराच्या दिशेने जात होती. या अपघातानंतर स्थानिकांनी पोलिसांना अपघाताची माहीती दिली.
छत्तीसगडच्या जांजगीर-चांपा जिल्ह्यातील मुलमुला पोलीस ठाण्याच्या हद्दीतील पकरिया जंगला दरम्यान एका कारला ट्रकने रविवारी सकाळी धडक दिल्याने कारचा चक्काचूर झाला. घटनेनंतर पोलिस घटनास्थळी पोहचले तर घटनास्थळावरील उपस्थित लोकांच्या मदतीने अपघाग्रस्तांना मोठ्या मुश्कीलीने क्षतिग्रस्त कारमधून बाहेर काढले. डायल 112 वरुन आलेल्या एम्ब्युलन्सद्वारे रामगडच्या आरोग्य केंद्रात जखमींना नेण्यात आले. तेथे तपासून त्यांना मृत घोषीत केले गेले. त्यानंतर मृतदेहांना पोस्टमार्टेमसाठी पाठविण्यात आले आहे. लग्नानंतर हे बलौदा येथे कारने परतत असताना हा भीषण अपघात झाला. ट्रक ड्रायव्हर अपघातानंतर गाडी तेथेच सोडून घटनास्थळावरून पळून गेला आहे.
या भीषण अपघाताच्या बातमीनंतर नवरा आणि नवरीच्या घरी सुरु असलेल्या आनंदी वातावरण ग्रहण लागले. लग्नघरात पार अवकळा पसरली. जेथे कालपर्यंत सनईचे सुर घुमत होते, नातेवाईकांच्या हसण्या खिदळल्याने वातावरण प्रफुल्लीत होते. तेथे सन्नाटा पसरला आहे. बलौदा रहिवासी असलेल्या शुभम सोनी आणि शिवरीनारायण येथे रहाणाऱ्या नेहा यांची शनिवारी विवाह झाला होता. गाडीत वधू आणि वरासह कुटुंबातील तीन सदस्य बसले होते.
पकरीया जंगलात सकाळी 5 वाजताच्या दरम्यान चंडी देवी मंदिराजवळ समोरून वेगाने येणाऱ्या एका वेगवान ट्रकने कारला जोरदार धडक दिली. हा अपघात इतका भीषण होता की कारचा चक्काचूर झाला. धडक झाल्यानंतर इतका मोठा आवाज झाला की परिसरातील नागरिक घटनास्थळी धावून आले. कारची अवस्था इतकी वाईट झाली होती की त्यातून जखमींना बाहेर काढताना खूप प्रयत्न करावा लागला. पोलिसांना माहिती दिल्यानंतर पोलीस आले. अपघातग्रस्त कारमधून जखमींना काढून त्यांना स्थानिक आरोग्य केंद्रात नेण्यात आले. त्यानंतर त्यांना तपासून डॉक्टरांनी मृत घोषीत करण्यात आले.