नवी दिल्ली | 25 जानेवारी 2024 : अयोध्या राम मंदिरातील रामलल्लाची प्राणप्रतिष्ठा झाल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुरुवारी पश्चिमी उत्तर प्रदेशातील बुलंदशहर येथून लोकसभा 2024 चा प्रचारस सुरुवात केली आहे. यावेळी पंतप्रधानांनी 19,100 कोटी रुपयांच्या योजना जाहीर केल्या. मोदी यांनी आपल्या भाषणात राम मंदिराची उभारणीपासून ते माजी मुख्यमंत्री कल्याण सिंह यांची देखील आठवण काढली. प्रचाराचा शुभारंभ करण्यास बुलंदशहराची निवड करण्यामागे पाच मोठी कारणे सांगितली जात आहेत.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लोकसभा 2024 निवडणूकांचा प्रचार पश्चिम उत्तर प्रदेशातील बुलंद शहरातून करण्यामागे अनेक कारणे आहेत. हा उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री कल्याण सिंह यांचा बालेकिल्ला राहीला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कल्याण सिंह यांचा उल्लेख करताना राम मंदिराचा उल्लेख केला. राम मंदिराने देशात निर्माण झालेल्या वातावरणाचा भाजपाला फायदा उठवायचा आहे. बुलंद शहराच्या सिंकदराबाद येथून निवडणूक प्रचाराचा श्रीगणेशा करण्यामागे प्रमुख कारण या विभागाला उत्तर प्रदेशाच्या विकासाचा चेहरा मानले जाते.
राम मंदिराच्या निर्मितीमुळे पूर्व उत्तर प्रदेशात भाजपाला जिंकण्याचा संपूर्ण आत्मविश्वास आहे. गोरखपूर उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचा बाले किल्ला मानला जातो. तर वाराणसी तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा मतदार संघ आहे. भाजपा पूर्व उत्तर प्रदेशात मजबूत स्थितीत आहे. त्यामुळे भाजपा पश्चिमी युपीमध्ये कोणताही धोका पत्करण्याच्या मनस्थितीत नाही. पश्चिमी उत्तर प्रदेशला जाट आणि गुर्जर बहुल क्षेत्र मानले जाते. येथे 17 टक्के मतदार जाट आहेत तर 16 टक्के गुर्जर आहेत.
जाट हे रालोदचे परंपरागत मतदार मानले जातात. समाजवादी पार्टी यावेळी राष्ट्रीय लोकदलाशी युती केली आहे. त्यामुळे सपा आणि रालोद यांच्या युतीची धार कमी करण्यासाठी भाजपाने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सिंकदराबाद येथील सभेने लोकसभा 2024 च्या प्रचाराची सुरुवात मुद्दामहून केली आहे. नरेंद्र मोदी यांनी माता वैष्णोदेवीचे दर्शन केल्यानंतर साल 2014 मध्ये लोकसभेच्या प्रचाराची सुरुवात बुलंदशहरातून केली होती आणि भाजपाने सर्व 14 जागांवर विजय मिळविला होता.
बुलंदशहरातून प्रचार सुरु करण्यामागे सर्वात मोठे कारण म्हणजे मोदींसाठी हे शहर लकी आहे. साल 2014 च्या लोकसभा निवडणूकीसाठी बुलंदशहरातून सुरुवात शुभ ठरली होती. त्यावेळी मोदी गुजरातचे मुख्यमंत्री होते. त्यानंतर साल 2014 मध्ये मोदींना मोठा विजय मिळाला मोदी पहिल्यांदा पंतप्रधान झाले.