डेहराडून : चारधाम यात्रा भाविकांसाठी खूपच महत्वाची समजली जाते. गेल्यावर्षी चारधाम यात्रेसाठी आलेल्या भाविकांचे मृत्यू झाल्याने यंदा सरकारने या यात्रेसाठी येणाऱ्या भक्तांच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी जय्यद तयारी केली आहे. यंदा या यात्रेसाठी पन्नास लाखांहून अधिक प्रवासी येण्याची शक्यता असल्याने सरकारने पहिल्यांदाच दर एक किलोमीटर वर वैद्यकीय मदतीसाठी ऑक्सिजन आणि अन्य सामुग्रीही सह हेल्थ पोस्ट सुसज्ज ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.
चारधाम यात्रेसाठी कोरोनाकाळानंतर येणाऱ्या धार्मिक पर्यटकांची खूपच वाढत चालली आहे. गेल्यावर्षी या यात्रेसाठी आलेल्या काही पर्यटकांचा मृत्यू झाला होता. त्यामुळे यंदा अधिक काळजी घेण्यात आली आहे. त्यासाठी केदारनाथ आणि यमुनोत्री पायवाटेवर दर एक किलोमीटरला एक हेल्थ पोस्ट सुसज्ज ठेवण्यात येणार आहे.
मेडीकल विद्यार्थ्यांची मदत घेणार
या बाबत उत्तराखंडचे आरोग्यमंत्री डॉ. धन सिंह रावत यांनी पत्रकारांना सांगितले की चारधाम यात्रेच्या तयारीला अंतिम रूप दिले जात आहे. धार्मिक पर्यटनात वाढ होत असून यंदा पर्यटकांना कोणतीही अडचण येऊ नये यासाठी दर एका किमीवर हेल्थ पोस्ट असेल तिथे ऑक्सिजनसह सर्व वैद्यकीय सोयी सुविधा असतील असे त्यांनी सांगितले. या वेळी मेडीकल फॅकल्टीच्या विद्यार्थ्यांना चारधाम यात्रेच्या मार्गावर तैनात करण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच मार्गावरील रूग्णालयानाही चांगले सुसज्ज ठेवण्यात येणार आहे.
चारधाम यात्रेसाठी यंदा पन्नास लाख यात्रेकरू येण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. त्यांच्या सोयीसाठी तयारीला अंतिम स्वरूप दिले जात असल्याचे आरोग्यमंत्री डॉ. धन सिंह रावत यांनी यावेळी सांगितले. आरोग्यमंत्री डॉ. धन सिंह रावत पुढे म्हणाले की, राज्य सरकारने केंद्र सरकारला चारधाम यात्रेसाठी हेली एम्ब्युलन्सी सोय करण्याची विनंती केली होती. या प्रस्तावाला केंद्र सरकारने मंजूरी दिली असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.
हेली एम्ब्युलन्सी सेवा
आता राज्य सरकार आणि एम्सच्या वतीने ही हेली एम्ब्युलन्सी सेवा चालविण्यात येणार आहे. या हेली सेवेचा लाभ चारधाम यात्रेलाही मिळणार आहे. केदारनाथ, बद्रीनाथ, यमुनोत्री आणि गंगोत्री यापैकी कुठेही गरज लागेल तेथे ही सेवा पुरविण्यात येणार आहे. त्यामुळे वैद्यकीय इमर्जन्सीची गरज असेल तेव्हा हेलिकॉप्टरद्वारे रूग्णांना हायर सेंटरला आणले जाईल. या सेवेचा वापर राज्यातही रस्ते अपघात किंवा इतर सामान्य आजारपणात रुग्णांना वेळेत रूग्णालयात पोहचविण्यासाठी होणार असल्याचे रावत यांनी म्हटले आहे.