या आदिवासी मुख्यमंत्र्यांच्या शरीरात हाडे जास्त म्हणून…, विधानसभेत माजी मुख्यमंत्री कडाडले…

| Updated on: Feb 05, 2024 | 6:44 PM

कथित जमीन घोटाळ्यात अटक करण्यात आलेल्या झारखंडचे माजी मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांनी सोमवारी विधानसभेत चंपाई सरकारच्या बहुमत चाचणीत भाग घेताना भारतीय जनता पक्ष (भाजप) आणि केंद्र सरकारवर जोरदार हल्ला चढवला.

या आदिवासी मुख्यमंत्र्यांच्या शरीरात हाडे जास्त म्हणून..., विधानसभेत माजी मुख्यमंत्री कडाडले...
HEMANT SOREN AND CHAMPAI SOREN
Image Credit source: TV9 NEWS NETWORK
Follow us on

झारखंड | 5 फेब्रुवारी 2024 : २२ जानेवारीला प्रभू रामाचा अभिषेक झाला. रामराज्य आले. पण, त्याचे पहिले पाऊल बिहारमध्ये टाकण्यात आले. मागासवर्गीय गरीब माणूस होता. त्याचे काय झाले ते तुम्ही पाहिले. आता दुसरे पाऊल झारखंडवर पडले आहे. एका आदिवासी मुख्यमंत्र्याला गिळंकृत करण्याचा प्रयत्न झाला. ईडीकडून आपल्याला झालेली अटक हा एक कटाचा भाग आहे. यासाठी 2022 पासून प्रयत्न सुरू होते, असा आरोप झारखंडचे माजी मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांनी केला.

झारखंडचे माजी मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांना इदीने अटक केली आहे. त्यानंतर झारखंड राज्यात राजकीय घडामोडी घडल्या. हेमंत सोरेन यांच्याऐवजी विधीमंडळ पक्ष नेते म्हणून चंपाई सोरेन यांची निवड करण्यात आली. विधीमंडळ पक्षनेते पदी निवड झाल्यावर चंपाई सोरे यांनी सत्तास्थापनेसाठी राज्यपाल यांच्याकडे पत्र दिले. राज्यपाल यांनी दोन दिवसांच्या प्रतीक्षेनंतर चंपाई सोरेन यांना शुक्रवारी राजभवनात शपथ घेतली.

चंपाई सोरेन यांचे नवे सरकार सोमवारी विश्वासदर्शक ठरावाला सामोरे गेले. मुख्यमंत्री चंपाई सोरेन यांना 47 तर विरोधकांना एकूण 29 मते पडली. याच विश्वासदर्शक ठरावावर बोलताना माजी मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांनी भाजप आणि ईडीवर हल्लाबोल केला. सोरेन यांनी त्यांच्या अटकेचे वर्णन लोकशाहीसाठी काळी रात्र होती असे केले.

हेमंत सोरेन यांनी यावेळी त्यांच्या अटकेवरून आणि बिहारमधील सरकार बदलण्यावरून भाजपवर ताशेरे ओढले. आपली अटक हा कट आहे. यासाठी 2022 पासून प्रयत्न सुरू होते. केंद्राने कट रचल्यानंतर अटक करण्यामध्ये राजभवनची भूमिका होती. पण, काही झाले तरी अश्रू ढाळणार नाही. योग्य वेळ आल्यावर ‘सरंजामी शक्तींना’ चोख प्रत्युत्तर दिले जाईल, असा इशारा त्यांनी यावेळी दिला.

विरोधकांनी विधानसभेत आपल्या विरोधात एकही पुरावा सादर केला तर राजकारणच काय झारखंडही सोडू असे आव्हान त्यांनी यावेळी भाजपला दिले. ईडीवर टीका करताना ते म्हणाले, या आदिवासी मुख्यमंत्र्यांच्या शरीरात हाडे जास्त आहेत. ईडी ते हाड काढण्यासाठी तपासणी करण्यात गुंतले आहे जेणेकरून आम्हाला ते गिळू शकतील. पण, ते इतके सोपे नाही. जर ते हाड घशात अडकले तर तुमचे संपूर्ण आतडे फाडून टाकते. म्हणून, काळजीपूर्वक गिळण्याचा प्रयत्न करा, असा संतप्त इशाराही हेमंत सोरेन यांनी दिला.