मुंबई | 27 जुलै 2023 : भारताचे 11 वे राष्ट्रपती म्हणून एपीजे अब्दुल कलाम यांनी पद भूषविले. यापूर्वी कोणत्याही राष्ट्रपतींना मिळाली नाही इतकी लोकप्रियता त्यांना त्यांच्या साध्या राहणीमुळे आणि जीवनामुळे मिळाली. तामिळनाडू येथील रामेश्वरम येथे अत्यंत गरीबीत त्यांचे बालपण गेले. त्यांचे वडील मच्छीमार होते. जेथे पोटाची भ्रांत जगण्याचा संघर्ष असताना शिक्षणाची आवड असल्याने त्यांनी भौतिक शास्र आणि ऐरोस्पेस अभियांत्रिकीत प्रावीण्य मिळवित देशाचे ‘मिसाईल मॅन’ बनले.
भारताचे 11 वे राष्ट्रपती म्हणून एपीजे अब्दुल कलाम यांनी साल 2002 ते 2007 असे काम केले. त्यांचा जन्म 15 ऑक्टोबर 1931 साली तामिळनाडूच्या रामेश्वरम येथे झाला. त्यांचा रामेश्वरम ते राष्ट्रपती या देशाच्या सर्वोच्च पदा पर्यंतचा प्रवास चित्तथरारक आणि प्रेरणादायी आहे. त्यांना लोकांचे राष्ट्रपती म्हणून नेहमीच ओळखले जाईल. इंडीयन स्पेस रिसर्च ऑर्गनायझेशन आणि डीफेन्स रिसर्च एण्ड डेव्हलमेंट ऑर्गनायझेशन ( DRDO ) या संस्थांमध्ये त्यांनी बहुमोल कामगिरी केली. 27 जुलै 2015 रोजी डॉ. कलाम यांना आयआयएम शिलॉंगमध्ये लेक्चर देत असताना हृदयविकाराचा तीव्र झटका आल्याने त्यांचे निधन झाले. त्यांचे अग्निपंख हे आत्मचरित्र आजही बेस्ट सेलर म्हणून प्रसिद्ध आहे.
अवुल पाकीर जैनुलाब्दीन तथा ए.पी.जे अब्दुल कलाम अवघ्या आठ वर्षांचे असल्यापासून काम करीत घरच्यांना मदत करीत शिकले. रेल्वेस्थानकावर सायकलीवरुन जाऊन वृत्तपत्रे विकत त्यांनी प्राथमिक शिक्षण पूर्ण केले. जीवनात कितीही कठीण आणि बिकट परिस्थिती असो तुमच्यात जर जिद्द असेल तर तुम्ही तुमची स्वप्न साकार करु शकता. ते पाचव्या इयत्तेत असताना वर्गातील मुलांनी शिक्षकांना प्रश्न विचारला पक्षी कसे उडतात. त्यावेळी शिक्षकांनी मुलांना समुद्र किनारी नेले. तेथे पक्ष्यांना दाखवून त्यांच्या शरीराची रचना समजावून सांगितली.
सर्व मुले शिक्षकांचे म्हणणे ऐकत होती. अब्दुल कलाम मात्र भविष्यात याच क्षेत्रात काही करण्याची योजना आखत होते. नंतर त्यांनी मद्रास इंजिनिअरिंग कॉलेजातून भौतिक आणि एअरोनॉटीकल इंजिनिअरिंगमध्ये प्राविण्य मिळविले. भारताचा अग्नि मिसाईलची श्रृखंला ही त्यांची देण आहे. त्यांनी बॅलेस्टीक मिसाईल आणि व्हेईकल तंत्रज्ञानात प्रगती करीत देशाला संरक्षण क्षेत्रात उंचीवर नेल्याने त्यांना भारताचे मिसाईल मॅन म्हणून ओळखले जाते.
एपीजी अब्दुल कलाम यांना रुद्र वीणा वाजवायला आवडायची. ते अत्यंत धार्मिक वृत्तीचे होते. रोज नेमाने नमाज पढायचे. कुराण बरोबर गीताही वाचायचे, माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांनी त्यांना राजकारणात यायची ऑफर दिली होती. परंतू त्यांनी नम्रपणे नाकारत संरक्षण संशोधनात कार्य करण्याची इच्छा असल्याचे सांगितले. कलाम यांना भारतरत्न पुरस्कार मिळाल्यानंतर त्यांचे पहिले अभिनंदन वाजपेयी यांनीच केले. कलाम यांना राष्ट्रपती पदासाठी वाजपेयींनीच राजी केले होते.