नवी दिल्ली | 13 जानेवारी 2024 : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लक्षद्वीपला भेट दिली. त्या भेटीत त्यांनी देशातील पर्यटन वाढवण्याचे आवाहन केले. पण, याच दरम्यान मालदीव सरकारच्या तीन मंत्र्यांनी भारताविरोधात वादग्रस्त वक्तव्य केली. प्रकरण चिघळत असल्याचे पाहून मालदीव सरकार बॅकफूटवर आले. ते तीन मंत्री निलंबित झाले. पंतप्रधान मोदींच्या लक्षद्वीप दौऱ्याचे फोटो व्हायरल झाले. यामध्ये टीअर ड्रॉप बीचच्या चित्रांचा समावेश होता. यात लक्षद्वीपच्या ३६ बेटांपैकी एका बेटाचे चित्र होते. ज्या बेटामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी चर्चेत आले. तेच बेट काही वर्षांपूर्वी माजी पंतप्रधान आणि बिग बी अमिताभ बच्चन यांच्यासाठी अनलकी ठरले होते.
लक्षद्वीपच्या ३६ बेटांपैकी हे एक बंगाराम बेट आहे. बंगाराम बेटाचा आकार अश्रूच्या थेंबासारखा आहे. म्हणून त्याला टीअर ड्रॉप बीच म्हणतात. हे बेट प्रवाळांनी भरलेले आहे. याशिवाय, येथे चमकदार पांढरी वाळू आणि हिरवीगार नारळाची झाडे आहेत. साहसी खेळांची आवड असलेल्या लोकांचे हे आवडते ठिकाण आहे. स्कूबा डायव्हिंग, खोल पाण्यात मासेमारी आणि विंडसर्फिंगसह अनेक वॉटर गेम्सची येथे व्यवस्था आहे.
माजी पंतप्रधान राजीव गांधी यांनी 1987 साली कुटुंब आणि मित्रांसोबत 10 दिवसांची सुट्टी घेतली होती. नववर्ष साजरे करण्यासाठी ते बंगाराम बेटावर पोहोचले. यादरम्यान राजीव गांधी यांचे मित्र बिग बी अमिताभ बच्चनही कुटुंबासह येथे पोहोचले. राजीव गांधी यांची ही गुप्त सहल होती. ही गुप्त भेट प्रसारमाध्यमांपासून लपवून ठेवण्यात आली होती. सरकारने गांधी कुटुंबाला समुद्र आणि हवाई मार्गाने येथे पोहोचविले. तरीही त्याची माहिती लीक झाली. राहुल गांधी यांनी त्यांच्या चार मित्रांसह लक्षद्वीप प्रशासनाच्या केशरी आणि पांढऱ्या हेलिकॉप्टरमधून उड्डाण केले. त्यामुळे या गुप्त सहलीची माहिती बाहेर आली.
बंगारामच्या या गुप्त सहलीसाठी तत्कालीन पंतप्रधान राजीव गांधी आणि त्यांच्या कुटुंबीयांनी आयएनएस विराट या नौदलाची युद्धनौका वापरली होती. ही युद्धनौका बंगाराम बेटावर १० दिवस निष्क्रियपणे उभी होती. ही माहिती समोर आल्यानंतर भाजपने आयएनएस विराटचे टॅक्सीमध्ये रूपांतर केल्याचा आरोप केला होता. सुट्टीला उपस्थित राहणाऱ्यांमध्ये सोनिया गांधी यांच्या आई, बहीण, भावजय, भाची, भाऊ आणि काका यांचा समावेश होता. राजीव गांधी यांची ही सुट्टी त्यांच्या इटालियन नातेवाईकांच्या उपस्थितीमुळे चर्चेत आली होती.
राजीव गांधी यांच्या या सिक्रेट ट्रिपमध्ये अमिताभ बच्चन, जया बच्चन, अभिषेक बच्चन, श्वेता बच्चन आणि अजिताभ बच्चन यांच्या मुलीचा समावेश होता. अमिताभ बच्चन यांचे भाऊ अजिताभ हे त्यावेळी परकीय चलन नियमन कायद्याच्या उल्लंघनाच्या प्रकरणात अडकले होते. त्यामुळे अजिताभ बच्चन यांची मुलगी उपस्थित असल्याचं समोर आल्यानंतर राजीव गांधी आणि अमिताभ बच्चन यांच्या अडचणीत आणखी वाढ झाली. अजिताभ बच्चन यांच्या स्वित्झर्लंडमधील मालमत्तेची चौकशी करणाऱ्या अधिकाऱ्यांना अशाप्रकारे राजीव गांधी यांना काय संदेश द्यायचा आहे, असा सवाल विरोधकांनी उपस्थित केला होता. २६ डिसेंबरला जया बच्चन येथे पोहोचल्या. त्यावेळी त्यांच्यासोबत प्रियांका गांधी, अभिषेक आणि श्वेता बच्चन होते.