जयपूर | मोदी सरकारला सत्तेत येऊन येत्या 30 मे रोजी 9 वर्ष पूर्ण होणार आहेत. यानिमित्ताने केंद्र सरकार या निमित्ताने जनसंपर्क अभियान राबवणार आहे. हे अभियान 15 मे ते 15 जून दरम्यान राबवण्यात येणार आहे. आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हे अभियान महत्वाचं समजलं जात आहे. लोकांच्या मनात भाजपबाबत असलेलं मत या निमित्ताने जाणून घेण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. तर दुसऱ्या बाजूला भाजपला सत्तेतून ओढण्यासाठी देशात विरोधकही एकवटताना दिसत आहे. त्यामुळे सत्ताधारी विरुद्ध विरोधक यांच्यातील हा संघर्ष दिसून येतोय.
या दरम्यान राजस्थानच्या राजकीय वर्तुळातून एक मोठी बातमी समोर आली आहे. माजी केंद्रीय मंत्री हे शुक्रवारी 19 मे रोजी काँग्रेसचा हात सोडत भाजपमध्ये घरवापसी करणार आहेत. त्यामुळे राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे.
माजी केंद्रीय मंत्री सुभाष महरिया हे काँग्रेसची साथ सोडून हाती कमळ घेणार आहेत. महरिया शुक्रवारी सकाळी पक्ष मुख्यालयात वरिष्ठ नेत्यांच्या उपस्थितीत पुन्हा भाजपात जाणार आहेत. महरिया यावेळेस पक्षाच्या प्राथमिक सदस्यत्वाची शपथ घेतली. यावेळेस राजस्थान भाजप प्रदेशाध्यक्ष सीपी जोशी, राजेंद्र राठोड आणि अन्य महत्वाचे नेते हजर असतील.
“मी भाजपचा कार्यकर्ता राहिलो आहे. आपल्या कुटुंबात परतताना फार चांगलं आणि प्रसन्न वाटतंय. मी कार्यकर्ता म्हणून पुन्हा प्रवेश करतोय. पक्ष मला जी जबाबदारी देईल ती पूर्ण करेन”, अशी प्रतिक्रिया सुभाष महरिया यांनी दिली.
महरिया यांना घरवापसीमुळे आगामी विधानसभा निवडणुकीत लक्ष्मणगढ विधानसभा मतदारसंघातून गोविंद सिंह डोटासरा यांच्या विरुद्ध उमेदवारी दिली जाऊ शकते.
सुभाष महरिया हे कला शाखेतून पदवीधर आहेत.महरिया हे 1998, 1999 आणि 2004 मध्ये लोकसभेवर निवडून गेले आहेत. मात्र महरिया यांना 1996 मध्ये काँग्रेसच्या हरीसिंह यांच्याकडून पराभव स्वीकारावा लागला होता. मात्र पुढच्याच वर्षी महरिया यांनी पराभवाचा वचपा घेतला. महरिया यांनी हरीसिंहा यांना पराभूत केलं.
त्यानंतर महरिया हे सलग 3 वेळा इथूनच खासदार म्हणून जिंकले. मात्र 2009 मध्ये त्यांना पुन्हा पराभूत व्हावं लागलं. त्यामुळे भाजपने 2014 मध्ये मोदी लाटेत महारिया यांना उमेदवारी नाकारली. त्यामुळे महरिया यांनी नाराज होत काँग्रेसमध्ये प्रवेश केला. महारिया यांनी या 2019 मध्ये भाजप विरुद्ध निवडणूक लढवली. महारिया हे पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या सरकारमध्ये मंत्री होते.