Coronavirus Fourth Wave : जगाच्या पाठीवर थैमान घालणाऱ्या कोरोनाने (Corona) चीनला आपल्या पंजात धरले आहे. येथील शांघाई शहरात सध्या लॉकडाऊन करण्यात आला आहे. तसेच लोकांना गरज असेल तरच बाहेर पडण्याच्या सुचना देण्यात आल्या आहेत. त्यामुळे कोरोनाची काळी छाया पुन्हा जगावर पडणार काय असेच प्रश्न अनेकांना पडला आहे. त्यादरम्यानच भारतात (India) सगळ सुरळीत सुरू अल्याने तर कोरोनाचे रुग्ण कमी झाल्याने कोरोनाचे सगळे नियम शिथिल करण्यात आले होते. दोन वर्षानंतर देशातील जनजीवन हे पुर्वपदावर येत होते. त्यानंतर आता मात्र पुन्हा चिंतेचे वारे देशावर वाहताना दिसत आहेत. देशात पुन्हा कोरोनाचे रूग्ण (Corona patient) वाढताना दिसत आहेत. गेल्या 24 तासांत, भारतात कोरोनाचे 2,183 नवीन रुग्ण आढळले आहेत. तर 214 रुग्णांचा मृत्यू झाला. एक दिवस आधी म्हणजेच शनिवारी 1,150 प्रकरणे नोंदवली गेली आणि 4 जनांचा मृत्यू झाला. सर्वात भयावह आकडेवारी दिल्ली-एनसीआरमधून समोर येत आहे. आकडेवारीनुसार, दिल्ली-नोएडामध्ये देशातील प्रत्येक चौथा कोरोनाचा रुग्ण समोर येत आहे.
आरोग्य मंत्रालयाने जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार, देशात आता कोरोनाचा संसर्ग वाढत आहे. संसर्गाचे प्रमाणही वाढत आहे. 24 तासांत देशात 2.61 लाख चाचण्या घेण्यात आल्या, त्यापैकी 2,183 लोकांचा अहवाल पॉझिटिव्ह आला. संसर्गाचे प्रमाण 0.83% पर्यंत वाढले. एका दिवसापूर्वी ते 0.31% होते. दिवसेंदिवस नवीन प्रकरणांमध्येही वाढ होत आहे. 4 ते 11 एप्रिल दरम्यान देशात 7,348 संक्रमित आढळले, ज्यांची संख्या 11 ते 17 एप्रिलपर्यंत 8,348 झाली. म्हणजेच एका आठवड्यात कोरोनाचे रुग्ण 10 टक्क्यांनी वाढले आहेत.
एकट्या राजधानी दिल्लीत कोरोनाचे 517 नवीन रुग्ण आढळले आहेत. त्याच वेळी नोएडामध्ये 65 नवीन प्रकरणे समोर आली असून त्यापैकी 19 विद्यार्थी आहेत. दिल्ली-नोएडामध्ये 582 नवीन संक्रमित आढळले आहेत. म्हणजेच देशातील प्रत्येक चौथा संक्रमित फक्त दिल्ली-नोएडामध्ये आढळून येत आहे. मात्र, दोन्ही ठिकाणी एकाचाही मृत्यू झाला नाही ही दिलासादायक बाब आहे. दिल्ली-नोएडा व्यतिरिक्त एनसीआरच्या इतर भागातही कोरोनाची प्रकरणे वाढत आहेत. दिल्लीनंतर गुरुग्राममध्ये सर्वाधिक 157 रुग्ण आढळले आहेत. रविवारी, फरिदाबादमध्ये 32 आणि गाझियाबादमध्ये 27 नवीन प्रकरणे नोंदवली गेली. गाझियाबाद आणि नोएडामध्येही मोठ्या संख्येने शालेय विद्यार्थ्यांना कोरोनाची लागण होत आहे. प्रकरणांमध्ये पुन्हा एकदा वाढ झाल्यानंतर उत्तर प्रदेश सरकारने एनसीआरमधील सर्व जिल्ह्यांना सतर्क राहण्याचे आदेश दिले आहेत.
उत्तर प्रदेश, पंजाब आणि हरियाणामधून बाहेर पडणाऱ्या कोरोनाची आकडेवारीही भीतीदायक आहे. अवघ्या तीन दिवसांत येथे नवीन रुग्णांची संख्या झपाट्याने वाढली आहे. 14 एप्रिल रोजी यूपीमध्ये कोरोनाचे 90 रुग्ण आढळले. तर रविवारी 135 रुग्ण आढळले. पंजाबमध्ये 14 एप्रिल रोजी केवळ 11 प्रकरणे नोंदवली गेली आणि 17 एप्रिल रोजी 8 संक्रमित आढळले. त्याचप्रमाणे 14 एप्रिल रोजी हरियाणात 170 रुग्ण आढळले, तर रविवारी 191 रुग्ण आढळले.
नक्कीच देशात पुन्हा एकदा कोरोनाचा वेग वाढला आहे. आताही निष्काळजीपणा सुरू राहिला तर चौथी लाट येऊ शकते. राजधानी दिल्लीत संसर्गाचे प्रमाण वाढल्यानंतर डॉक्टरांनी चिंता व्यक्त केली आहे. मास्क पुन्हा अनिवार्य केले जावेत, असे डॉक्टरांचे मत आहे. गर्दीच्या ठिकाणी जाणे टाळावे, असा सल्लाही डॉक्टरांनी दिला आहे. दिल्लीच्या सरकारी रुग्णालयातील आपत्कालीन विभागाच्या प्रमुख डॉ. रितू सक्सेना यांनी वृत्तसंस्थेला सांगितले की, आता मोठे मेळावे टाळले पाहिजेत. तसेच, आता लोकांनी मास्क घालावे आणि सर्व कोविड प्रोटोकॉलचे काटेकोरपणे पालन करावे. अपोलो रुग्णालयाचे डॉक्टर सुरंजित चॅटर्जी म्हणाले की रुग्णालयात दाखल झालेल्या रुग्णांची संख्या अजूनही खूपच कमी आहे आणि संसर्ग झालेल्यांमध्ये लक्षणे देखील सौम्य आहेत, परंतु आपण सावधगिरी बाळगली पाहिजे. त्यांनी मास्क पुन्हा अनिवार्य करण्याची मागणीही केली आहे.