मुंबई : आरामदायीपणा बरोबरच वेगवान प्रवास घडविणारी विना इंजिनाची आधुनिक सेमी हायस्पीड ‘वंदेभारत’ ( Vande Bharat Train ) ट्रेन प्रवाशांना पसंत पडत आहे. मुंबई ते गोवा मार्गाच्या वंदेभारतला उद्या पंतप्रधान ( pm modi ) हिरवा झेंडा दाखवत आहेत. आता रेल्वेने अॅल्युमिनियम ( Aluminium ) बनावटीच्या 100 ट्रेन बनविण्यासाठी टेंडर काढले असून त्यासाठी फ्रान्स अल्स्टॉम कंपनीने सर्वात कमी बोली लावली आहे. भारतीय रेल्वेला वंदेभारतचा पहिला स्लिपर ( Sleeper Coach ) कोच व्हर्जन साल 2024 च्या पहिल्या तिमाहीत लॉंच करायचा आहे. आतापर्यंत 102 चेअर कार आणि 200 स्लिपर कोच वंदेभारतच्या कंत्राटाचे वाटप झाले आहे.
वंदेभारतने देशातील महानगरांना एकमेकांशी जोडले जात आहे. देशभरात 75 वंदेभारत पहिल्या टप्प्यात सुरु करण्यात येत आहेत. आता स्टीलच्या बांधणी ऐवजी नवीन पद्धतीच्या अॅल्युमिनियम धातूच्या 100 ट्रेन बांधणीसाठी 30,000 कोटीचे टेंडर रेल्वेने काढले होते. या टेंडरला प्रतिसाद देत फ्रान्सच्या अल्स्टॉम कंपनीने प्रत्येकी 151 कोटी रुपयांना एक ट्रेन अशा 100 ट्रेन बांधण्यास तयारी दर्शविली आहे. या टेंडरला प्रतिसाद देणाऱ्या अन्य कंपन्यामध्ये स्विस कंपनी स्टॅडलर रेल आणि हैदराबादच्या मेधा सर्वो ड्राईव्ह यांचा समावेश असून त्यांनी 170 कोटी रुपयांत एक ट्रेन बांधण्याची तयारी दर्शविली आहे.
100 एल्युमिनियम वंदेभारत ट्रेनची निर्मिती आणि मेंटेनन्स अशा करारावर 30 हजार कोटी रुपयांची निविदा जिंकणाऱ्या कंपनीला ट्रेनची डीलीव्हरी दिल्यानंतर 13,000 कोटी रुपये मिळणार आहेत. तसेच तर 35 वर्षांच्या देखभालीसाठी उर्वरीत 17,000 कोटी मिळतील. या टेंडरच्या शर्यतीत पाच कंपन्या होत्या. त्यात बीईएमएल हीच्याशी भागीदारीत जर्मनीची सीमेन्स कंपनी, रशियाची ट्रान्समॅशहोल्डींग आणि रेल विकास निगम लिमिटेड यांचा समावेश आहे. परंतू या कंपन्यांनी तांत्रिक पात्रता नसल्याने त्यांनी निविदात प्रक्रियेत सहभाग घेतला नसल्याचे मनी कंट्रोल बेवसाईटने म्हटले आहे.
अॅल्युमिनियम वंदेभारत वजनाने अधिक हलकी असणार असून स्टेनलेस स्टील बॉडीच्या वंदेभारतच्या तुलनेत त्या अधिक ताकदवान असणार आहेत. वंदेभारतच्या कंत्राटानूसार देशातील दिल्ली, मुंबई, बंगलुरू आणि जोधपुर येथील मेन्टेनन्स डेपोमध्ये वंदेभारतची देखभाल आणि दुरुस्ती होणार आहे. कमी बोली लावणारी कंपनी तिचा पहिला प्रोटोटाईप दोन वर्षात आणणार आहे. या ट्रेनच्या निर्मितीसाठी गेल्यावर्षी जुलैमध्ये निविदा काढली होती. 15 फेब्रुवारी रोजी निविदा खुल्या झाल्या. परंतू निविदा बंद करण्याची तारीख 23 फेब्रुवारीपर्यंत वाढविण्यात आली होती.