नवी दिल्ली | 5 फेब्रुवारी 2024 : आजकाल बहुतेक लोक विमा पॉलिसींमध्ये गुंतवणूक करतात. विमा पॉलिसी तुम्हाला कोणत्याही अप्रिय घटनेबाबत आर्थिक सहाय्य मिळवून देते. परंतु, कोणतीही विमा पॉलिसीचा प्रीमियम भरला असेल तरच तुम्हाला त्याचे फायदे मिळू शकतात. मात्र, बहुतेक लोक एटीएममधून पैसे काढण्यासाठी किंवा व्यवहार करण्यासाठी डेबिट कार्ड वापरतात. तुमच्याकडे असलेले हेच डेबिट कार्ड तुम्हाला मोफत विमा संरक्षण मिळवून देते. पण, डेबिट कार्डवर मोफत अपघाती विमा संरक्षण मिळण्यासाठी काही अटी, शर्ती आहेत.
काही डेबिट कार्ड 3 कोटी रुपयांपर्यंत मोफत अपघाती विमा संरक्षण देतात. हे विमा संरक्षण विनामूल्य दिले जाते. यासाठी डेबिट कार्ड धारकाकडून कोणताही प्रीमियम आकारला जात नाही. तसेच, बँकांकडून कोणतेही अतिरिक्त दस्तऐवज विचारले जात नाही.
सर्वात महत्त्वाचे म्हणजे कार्डधारकाने ठराविक कालावधीत त्या डेबिट कार्डद्वारे काही व्यवहार करावे लागतात. मात्र, पात्र व्यवहार करण्याचे निकष प्रत्येक बँकेत वेगवेगळे आहेत. UPI द्वारे होणारे व्यवहार साधारणपणे विमा संरक्षणासाठी पात्र नसतात. पण, पॉइंट ऑफ सेल (POS) व्यवहार किंवा ई-कॉमर्स ऑनलाइन व्यवहार हे विमा संरक्षणासाठी पात्र आहेत.
मोफत अपघाती विमा संरक्षणासाठी पात्र होण्यासाठी पात्र व्यवहार पार पाडण्याचे निकष सर्व बँकांमध्ये वेगवेगळे आहेत. उदा. एचडीएफसी बँक मिलेनिअम क्रेडिट कार्ड देशांतर्गत प्रवासासाठी 5 लाख रुपये आणि आंतरराष्ट्रीय विमान प्रवासासाठी 1 कोटी रुपयांचे मोफत विमा संरक्षण देण्यात येते. मिलेनिअम क्रेडिट कार्डावरील विमा पॉलिसी सक्रिय करण्यासाठी कार्डधारकाला 30 दिवसांत किमान एक व्यवहार करावा लागतो.
कोटक महिंद्रा बँकेने मोफत विमा संरक्षणासाठी पात्र होण्यासाठी क्लासिक डेबिट कार्ड धारकांनी किमान रु. 500 चे किमान 2 व्यवहार शेवटच्या 30 दिवसांत पूर्ण करणे आवश्यक आहे. तर, डीबीएस बँक इंडिया इन्फिनिटी डेबिट कार्डधारकांना विमा संरक्षण सक्रिय करण्यासाठी शेवटच्या 90 दिवसांच्या आत व्यवहार करावा लागतो.