मुंबईत एनसीपी नेते बाबा सिद्दीकी यांची हत्या करण्यात आली. त्यामुळे देशभर खळबळ उडाली आहे. केवळ सलमान खानच्या जवळचे असल्याने बाबा सिद्दीकी यांना बिश्नोई गँगने उडवलं आहे. त्यामुळे बिश्नोई गँगची दहशत निर्माण झाली आहे. तुरुंगात असलेला लॉरेन्स बिश्नोई काहीही करू शकत असल्याचं उघड झालं आहे. असं असतानाच दुसरीकडे बिहारच्या पूर्णियाचे खासदार पप्पू यादव यांनी थेट लॉरेन्स बिश्नोईलाच धमकी दिली आहे. तुरुंगात असलेला कवडीमोलाचा गुन्हेगार कधी मूसेवालाला मारत आहे, तर कधी करणी सेना प्रमुखाची हत्या करत आहे. आता त्याने बाबा सिद्दीकींना मारलं आहे. जर मला कायद्याने परवानगी दिली तर मी 24 तासात बिश्नोईचं नेटवर्क उद्ध्वस्त करून टाकेन, असा इशाराच पप्पू यादव यांनी दिला आहे.
पप्पू यादव यांनी सोशल मीडियावर एक पोस्ट करून हा इशारा दिला आहे. यावेळी त्यांनी पोलीस व्यवस्थेवरही तोंडसुख घेतलं आहे. हा देश आहे की… एक गुन्हेगार तुरुंगात बसून आव्हान देत लोकांना मारत आहे. आपण मात्र मूकदर्शक बनून सर्व काही पाहत आहोत. कायद्याने माझे हात बांधले आहेत. नाही तर या गुंडाची संपूर्ण टोळीच मी अवघ्या 24 तासात उद्ध्वस्त करू शकतो. एक बदमाश तुरुंगात राहून एकामागोमाग एक गुन्हे घडवत आहे. अन् देशभरातील पोलीस हातावर हात ठेवून बसली आहे, ही अजबच परिस्थिती आहे, असा संताप पप्पू यादव यांनी व्यक्त केला आहे.
खासदार पप्पू यादव यांनी लॉरेन्स बिष्णोई याला धमकी दिली आहे –
दुसरीकडे पोलिसांनी बाबा सिद्दीकी हत्याकांडात सहभागी असलेल्या चौथ्या आरोपीलाही पोलिसांनी अटक केली आहे. मोहम्मद झिशान अख्तर असं या आरोपीचं नाव आहे. तो नकोदर येएथील शकर गावातील रहिवासी आहे. दोन वर्षापूर्वी हत्येच्या एका प्रकरणात जालंधर पोलिसांनी त्याला अटक करून तुरुंगात टाकलं होतं. मुंबई पोलिसांनी बाबा सिद्दीकी यांच्या हत्येप्रकरणी आतापर्यंत तीन लोकांना अटक केली आहे. अटक करण्यात आलेली दोन्ही आरोपी शुटर आहेत. गुरमेल सिंग हा हरियाणाच्या कॅथल इथला आहे. तर यूपीच्या बहराइच येथील धर्मराज यालाही अटक केली आहे. तिसरा शुटर शिवकुमार हा फरार होता.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 7 जून रोजी झिशान तुरुंगात सुटला होता. त्यानंतर तो शूटर गुरमेल याला जाऊन भेटला होता. हरियाणाच्या कॅथल येथे त्याने गुरमेलची भेट घेतली होती. तिथेच त्यांना लॉरेन्स बिश्नोईचा संदेश मिळाला. त्यानंतर दोघेही बाबा सिद्दीकी यांची हत्या करण्यासाठी मुंबईकडे रवाना झाले. मुंबईत आल्यावर या कांडात अन्य लोक सहभागी झाले. या आरोपींनी आधी रेकी केली. बाबा सिद्दीकी यांच्या रुटीनची माहिती घेतली. त्यानंतर लॉरेन्स बिश्नोईला अपडेट दिली. बिश्नोईकडून होकार मिळताच या तिघांनी शनिवारी रात्री बाबा सिद्दीकी यांच्यावर गोळीबार केल्याचं सूत्रांनी सांगितलं.