मुंबई | 16 जुलै 2023 : पावसाळा सुरु होताच पर्यटकांना धबधब्यांना जाण्यासाठी गर्दी होत असते. बेळगाव आणि आजबाजूच्या धबधब्यांना भेट देण्यासाठी पर्यटकांची येथे मोठी गर्दी होत असते. धबधब्यात भिजताना पर्यटकांना कशाचेही भान रहात नाही. त्यामुळे सेल्फी काढताना अनेक अपघात होत असतात. त्यामुळे आता पर्यटकांनी अशा धबधब्यांना भेट देण्यासाठी जाण्यापूर्वी पोलीस आणि वनविभागाची सूचना लक्षात घ्यायला हवी, पाहा प्रशासनाने काय काढले आहेत आदेश.
मान्सून सुरु झाल्यानंतर जुलै महिन्यात बहुतेक पर्यटक पावसाचा आनंद घेण्यासाठी पर्यटकांचे आकर्षण असलेल्या धबधब्यांच्या ठिकाणी भिजायला जात असतात. माळशेज घाटासह लोणावळा आणि खंडाळा, कर्जत जवळील पळसधरी, पनवेल , नवीमुंबई अशा आजूबाजूच्या धबधब्यांना पर्यटकांची मोठी गर्दी उसळत असते. परंतू अशा धबधब्यामध्ये दरडी कोसळणे, किंवा पाण्यात सुर मारताना खोलीचा अंदाज न आल्यानेही अपघाती मृत्यू झाल्याच्या अनेक घटना घडल्या आहेत.
बेळगाव आणि गोव्याच्या आजूबाजूच्या धबधब्यांना गर्दी होत असते. यात गोव्याजवळील दूधसागर धबधबा पाहताना अनेक अपघात होत असल्याने आता तेथे दक्षिण-पश्चिम रेल्वे डीव्हीजनने दूधसागर धबधब्यावर पावसाळ्यात जाण्यासाठी बंदी घातली आहे. गोवा वनविभागाने यासंबंधी आदेश काढले आहेत.
अत्यंत विशाल जलप्रपात असलेल्या अत्यंत विलोभनीय फेसाळत्या दूधसागर धबधब्याला पाहण्यासाठी आणि तेथे सेल्फी काढण्यासाठी जीव धोक्यात घालणाऱ्या पर्यटकांना आवर घालण्यासाठी प्रतिबंधात्मक आदेश जारी केले आहेत. गोवा वन विभागानेही कुले येथून दूधसागर धबधब्याला जाणाऱ्या पर्यटकांवर बंदी घातली आहे. त्यामुळे कर्नाटक, महाराष्ट्र आणि गोवा राज्यातील पर्यटकांचा हिरमोड झाला आहे.
काही वर्षांपूर्वी दिवंगत रेल्वे राज्यमंत्री सुरेश अंगडी यांनी दूधसागर धबधबा पाहण्यासाठी जाणाऱ्या पर्यटकांसाठी सुविधा पुरविली होती. बेळगाव येथून एक लोकल ट्रेनही त्यासाठी सोडण्यात येत होती. परंतू काही काळानंतर त्यावर बंदी घालण्यात आली. येथे लोकल थांबवून अनेक पर्यटक धबधब्यांच्या उडणाऱ्या तुषारांना अंगावर झेलत मान्सूनची मज्जा घेत असत.
अनेकदा काही उत्साही पर्यटकांना रेल्वे पोलिसांच्या लाट्यांचा प्रसाद देखील खावा लागत असतो. गोव्याच्या सीमेवरुन व्हाया कुले येथून देखील खाजगी वाहनांनी देखील दूधसागर धबधब्याला जातात, परंतू पावसात अतिवृष्टीमुळे येथे नदीचे पात्र विस्तारत असल्याने तसेच येथे रेल्वेमार्गावर पर्यटक जीव धोक्यात घालून सेल्फी काढीत असतात. त्यामुळे गोवा वनविभाग दरवर्षी पर्यटकांवर सुरक्षेच्या कारणास्तव धबधब्याजवळ जाण्यावर प्रतिबंधित आदेश काढीत असतो.