मुंबई : कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटना (EPFO Rate of interest) च्या केंद्रीय विश्वस्त मंडळाने (CBT) 2023-24 साठी कर्मचारी भविष्य निर्वाह निधी खात्यासाठी व्याज दर जाहीर केला आहे. चालू आर्थिक वर्षासाठी ईपीएफओने करोडो कर्मचाऱ्यांच्या व्याजदरात वाढ केली आहे. पीटीआय या वृत्तसंस्थेनुसार, आता कर्मचाऱ्यांना पूर्वीपेक्षा 0.10 टक्के अधिक व्याज मिळणार आहे. याचा अर्थ आता तुमच्या पीएफ खात्यावर 8.25 टक्के व्याजदर दिला जाईल. उल्लेखनीय आहे की, इपीएफओ ने गेल्या वर्षी 28 मार्च रोजी 2022-23 साठी कर्मचारी भविष्य निर्वाह निधी खात्यांसाठी 8.15 टक्के व्याजदर जाहीर केला होता. तर इपीएफओ साठी 8.10 टक्के व्याज दिले होते.
मार्च 2022 मध्ये, कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेने 2021-22 साठीचा व्याजदर 8.1 टक्के केला होता, जो गेल्या चार दशकांच्या तुलनेत कमी आहे. हा 1977-78 नंतरचा नीचांक होता. सेंट्रल बोर्ड ऑफ ट्रस्टीज (CBT), EPFO मधील निर्णय घेणारी संस्था, शनिवारी झालेल्या बैठकीत, 2023-24 मध्ये कर्मचारी भविष्य निर्वाह निधीसाठी व्याजदर 8.25 टक्के करण्याचा निर्णय घेतला आहे. CBT ने मार्च 2021 मध्ये EPF वर 8.5 टक्के व्याजदर निश्चित केला होता.
कामगार आणि रोजगार मंत्री भूपेंद्र यादव यांच्या अध्यक्षतेखालील EPFO च्या केंद्रीय विश्वस्त मंडळाने (CBT) शनिवारी EPFO च्या 235 व्या बोर्ड बैठकीत प्रस्तावित व्याजदराला मंजुरी दिली. मात्र, याबाबत अद्याप कोणतीही अधिकृत अधिसूचना जारी करण्यात आलेली नाही. वाढीव व्याजदराला अर्थ मंत्रालयाकडून मंजुरी मिळाल्यानंतर सूचित केले जाईल. यानंतर, EPFO द्वारे व्याजदराचे पैसे ग्राहकांच्या खात्यात जमा केले जातील.
अधिसूचना जारी झाल्यानंतर, VPF वर 8.25 टक्के व्याज दर देखील लागू होईल. याशिवाय, ज्या ट्रस्टला नियमांनुसार सूट मिळते ते देखील त्यांच्या कर्मचाऱ्यांना वाढलेल्या EPFO दराचा लाभ देण्यास बांधील आहेत. 20 किंवा 20 पेक्षा जास्त कर्मचारी असलेल्या कंपनीत पगारदार वर्गातील कर्मचाऱ्यांसाठी कर्मचारी भविष्य निर्वाह निधी (EPF) आवश्यक आहे. कर्मचाऱ्यांच्या मासिक पगाराच्या 12 टक्के रक्कम ईपीएफ खात्यात गुंतवली जाते. त्याचप्रमाणे EPF मध्ये नियोक्त्याकडून समान योगदान दिले जाते.