राम भक्तांसाठी खुशखबर, आता रामललासोबत घेता येणार सेल्फी

| Updated on: Jul 05, 2024 | 10:18 PM

अयोध्या येथील राम मंदिरात प्रभू राम विराजमान झाले. भक्तांचा ओघ सुरु झाला. राम मंदिर भक्तांसाठी खुले झाले आणि राम मंदिरात मोबाईल घेऊन जाणाऱ्या भक्तांची संख्या वाढली. मात्र, हळूहळू सुरक्षेच्या कारणास्तव मोबाईल फोनवर बंदी घालण्यात आली.

राम भक्तांसाठी खुशखबर, आता रामललासोबत घेता येणार सेल्फी
AYODHYA RAM MANDIR
Image Credit source: TV9 NEWS NETWORK
Follow us on

Ayodhya News : भगवान राम अयोध्येत विराजमान होऊन जवळपास 6 महिने उलटले आहेत. रामललाच्या दर्शनासाठी दररोज एक लाखाहून अधिक भाविक अयोध्येत पोहोचत आहेत. अयोध्येला पोहोचणाऱ्या सर्व भाविकांना आपल्या मोबाईलमध्ये प्रभू रामाचे छायाचित्र टिपण्याची इच्छा असते. हे लक्षात घेऊन राम मंदिर ट्रस्टने दर्शन मार्गावर अनेक ठिकाणी सेल्फी पॉइंट तयार केले आहेत. देशभरातून आणि जगभरातून येणारे राम भक्त येथे प्रभू रामसोबत सेल्फी घेताना दिसत आहेत. रामजन्मभूमी तीर्थ क्षेत्र ट्रस्टने रामजन्मभूमी मार्गावर दोन सेल्फी पॉइंट बनवले असून ते मुख्य मंदिराच्या गर्भगृहाप्रमाणेच सजवले आहे.

राम मंदिरात वाढणारी गर्दी पाहता उत्तर प्रदेश सरकारने अनेक नवीन नियम जारी केले होते. प्रभू रामाच्या सिंहासनावर विराजमान झाल्यानंतर काही दिवस राम भक्त नव्याने बांधलेल्या मंदिरात मोबाईल फोन घेऊन जात होते. परंतु, उत्तर प्रदेश सरकारने सुरक्षेच्या कारणास्तव मोबाईल फोनवर बंदी घातली होती. मात्र, राम मंदिर ट्रस्टने भाविकांसाठी सेल्फी घेण्याची सुविधा सुरू केली आहे.

श्री रामजन्मभूमी तीर्थ क्षेत्र ट्रस्टचे कार्यालय प्रभारी प्रकाश गुप्ता यांनी सांगितले की, रामलल्ला परिसरात मोबाईल फोनवर बंदी आहे. मंदिर परिसरात फोटो आणि सेल्फी काढताना भाविकांना अडचणी येत होत्या. हे लक्षात घेऊन राम मंदिर ट्रस्टने मोबाईल फोनवर पूर्ण बंदी घातली होती. मात्र, आता रामजन्मभूमी मार्गावर रामभक्तांसाठी दोन ठिकाणी सेल्फी पॉइंट बनवण्यात आले आहेत. इतरही अनेक ठिकाणी सेल्फी पॉइंट तयार करण्याची तयारी सुरू आहे.

बनारसहून अयोध्येत आलेल्या भक्त प्रियांका यांनी रामलल्लाचे दर्शन घेतल्यानंतर आनंद झाला. सेल्फी पॉइंटवर प्रभू राम सोबत सेल्फी काढला. खूप छान वाटले. राम मंदिर ट्रस्ट खूप चांगले काम करत आहे. प्रत्येक भक्ताला आपल्या देवासोबत फोटो काढण्याची इच्छा असते. ही इच्छा ट्रस्टने पूर्ण केल्याने तिने ट्रस्टचे आभार मानले आहेत.

राममंदिर ट्रस्टच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार रामलला मंदिरातील पुजाऱ्यांच्या पोशाखातही बदल करण्यात आला आहे. त्यांना मंदिरात मोबाईल फोन घेऊन जाण्यास बंदी घातली आहे. आत्तापर्यंत गर्भगृहातील पुजारी भगव्या कपड्यात दिसत होते. ते भगवा फेटा, भगवा कुर्ता आणि धोतर परिधान करत असे. पण, आता पुरोहितांनी पिवळे (पितांबरी) रंगाचा कुर्ता, पगडी, धोतर घालण्यास सुरुवात केली आहे. 1 जुलैपासून नवा ड्रेस कोड लागू झाला आहे. नवीन पुरोहितांना पिवळे फेटे बांधण्याचे प्रशिक्षण देण्यात आले आहे.