नवी दिल्ली : केंद्रीय कर्मचारी होळीपूर्वीच रंगाची उधळण करायला मोकळे झाले आहे. मोदी सरकारने केंद्रीय कर्मचाऱ्यांना होळी पूर्वीच मोठे गिफ्ट दिले. कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता (DA Hike) वाढवला. महागाई भत्ता वाढविण्याच्या निर्णयाला मंजुरी देण्यात आली. बुधवारी कॅबिनेटची बैठक झाली. त्यात महागाईशी दोन हात करण्यासाठी केंद्र सरकारने कर्मचाऱ्यांचे हात बळकट केले. मोदी कॅबिनेटने (Modi Cabinet) महागाई भत्यात वाढीला मंजुरी दिली. अर्थात याविषयीची कोणतीही अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही. पण बैठकीत हा निर्णय झाल्याचे वृत्त आहे. या बैठकीतील निर्णयाची माहिती पत्रकार परिषदेमध्ये देण्यात येणार नसल्याचे सांगण्यात येत आहे. 7व्या वेतन आयोगानुसार (7th Pay commission) आणि इतर इंडेक्सनुसार कर्मचाऱ्यांना महागाई भत्ता मूळ वेतनाआधारे देण्यात येईल.
मोदी सरकारने बुधवारी महागाई भत्ता वाढविण्यास मंजुरी दिली. 1 जानेवारी 2023 रोजीपासून हा निर्णय लागू होईल. म्हणजेच केद्रीय कर्मचाऱ्यांना मार्च महिन्याच्या पगारात घसघशीत रक्कम मिळणार आहे. त्यांना जानेवारी आणि फेब्रवारी महिन्याची थकबाकीही मिळेल. डीएममध्ये (Dearness Allowance) 4 टक्के वाढीचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यानुसार, डीए सध्याच्या 38 टक्क्यांहून 42 टक्के होईल.
कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता निश्चित करण्यासाठी केंद्र सरकार अखिल भारतीय ग्राहक किंमत निर्देशांकांचा AICPI-IW (All India Consumer Price Index- Industrial Worker) आधार घेते. कर्मचाऱ्यांना वर्षांतून दोनवेळा महागाई भत्ता देण्यात येतो. जानेवारी आणि जुलै महिन्यात महागाई भत्ता लागू करण्यात येतो. पण प्रत्येक वर्षी डीएची घोषणा उशीरा करण्यात येते. जानेवारीत महागाई भत्ता निश्चित करण्याचा निर्णय मार्च महिन्यात घेण्यात आला असला तरी कर्मचाऱ्यांना जानेवारी आणि फेब्रुवारी महिन्याची थकबाकी मिळणार आहे. जुलै महिन्याचा निर्णयही पार सप्टेंबर-ऑक्टोबर दरम्यान घेण्यात येतो.
कॅबिनेटच्या बैठकीत महागाई भत्त्यात किती वाढ करायची याचा आढावा घेण्यात आला. पण याविषयीची अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही. झी बिझनेसने याविषयीचे वृत्त दिले आहे. त्यानुसार, कॅबिनेटने डीए वाढीस मंजुरी दिली आहे. डीएस वाढून 42% करण्यावर कॅबिनेटमध्ये सर्वांनीच सहमती दर्शवली. होळीपूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी याविषयीची घोषणा करतील, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. तर अर्थ मंत्रालय याविषयीची अधिसूचना काढेल. मार्च महिन्याच्या पगारासोबतच कर्मचाऱ्यांना महागाई भत्त्याची रक्कम देण्यात येईल. कर्मचाऱ्यांना दोन महिन्यांची थकबाकी (DA Arrear) ही देण्यात येईल.
जर एखाद्या कर्मचाऱ्यांचे मूळ वेतन 18000 रुपये असेल तर त्याच्या पगारात 720 रुपये प्रति महिना वाढ होईल. कर्मचाऱ्याच्या वेतनात वार्षिक एकूण 8640 रुपयांची वाढ होईल. तर एखाद्या कर्मचाऱ्यांचे मूळ वेतन 56900 रुपये प्रति महिना असेल तर त्यांच्या वेतनात दरमहिन्याला 2276 रुपयांचा फायदा होईल. कर्मचाऱ्याच्या वेतनात वार्षिक एकूण 27312 रुपयांची वाढ होईल.