नवी दिल्ली | 3 ऑगस्ट 2023 : पश्चिम बंगालच्या राज्यपालांनी राजभवनात एण्टी करप्शन सेल सुरु केला आहे. या निर्णयावर मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी टीका केली आहे. राज्य सरकारच्या कारभारात ही ढवळाढवळ असल्याची टीका ममता बॅनर्जी यांनी केली आहे. पश्चिम बंगालचे राज्यपाल आनंद बोस हे तोंडाला मुखपट्टी लावून भाजपाच्या इशाऱ्यावर काम करीत असल्याचा आरोप मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी केला आहे.
बंगालचे राज्यपाल आनंद बोस यांनी राजभवनात भ्रष्टाचार निर्मूलन सेल सुरु केला आहे. त्यामुळे मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी संताप व्यक्त केला आहे. एण्टी करप्शन सेल उघडण्याच्या राज्यपालांना काही अधिकार नाही. आम्ही राज्यपालांचा आदर करतो. त्यांनी अशा प्रकारे थेट राजभवनात एण्टी करप्शन सेल उघडणे हे राज्य सरकारच्या अधिकारात अनावश्यक ढवळाढवळ आहे असे मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी म्हटले आहे.
पश्चिम बंगालचे राज्यपाल बोस यांनी राजभवन येथे एण्टी करप्शन सेलचे उद्घाटन केले आहे. या सेलमुळे नागरिकांना त्यांच्या तक्रारी मांडता येऊन त्यांचे संबंधित विभागाकडून निराकरण करता येणार असल्याचे राजभवन कार्यालयाने म्हटले आहे. मी पाहते आहे की ते तोंडावर मास्क लावून भाजपाच्या इशाऱ्यावर काम करीत आहे, असे मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी म्हटले आहे. भारतीय घटनेमध्ये गव्हर्नरच्या जबाबदारी नेमक्या काय आहेत ते मांडलेले आहे असेही ममता बॅनर्जी यांनी म्हटले आहे.