मेरठ : उत्तर प्रदेशातील मेरठ येथील अहर पोलिस स्टेशन अंतर्गत ही आश्चर्यकारक घटना घडली आहे. एका 19 वर्षीय पीडित मुलीच्या वडिलांनी आपल्या मुलीवर अत्याचार झाल्याची तक्रार केली. त्यांनी केलेल्या तक्रारीनुसार पोलिसांनी 23 वर्षीय आरोपीसह 90 वर्षीय आजोबा यांच्यासह कुटुंबातील चार पिढ्यांविरुद्ध एफआयआर नोंदवला आहे. आश्चर्याची गोष्ट म्हणजे एफआयआरमध्ये नाव असलेल्या आजोबांचे 20 वर्षांपूर्वी बुलंद शहरमध्ये निधन झाले आहे. लग्नाच्या बहाण्याने त्या तरुणाने शारीरिक शोषण केल्याचा आरोप पीडितेने केला आहे. ही बाब त्याने घरच्यांना सांगितल्यावर त्यांनीही आरोपीला साथ दिली असा आरोप करत हा एफआयआर दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार 19 वर्षीय बलात्कार पीडितेच्या वडिलांनी दिलेल्या तक्रारीनुसार त्यांच्याच गावातील 23 वर्षीय तरुणाने लग्नाच्या बहाण्याने सुमारे दोन वर्षे मुलीवर बलात्कार केला. त्या मुलीने तरुणावर लग्नासाठी दबाव टाकला. तेव्हा त्याने 31 मे 2023 रोजी मुलीला जवळच्या शेतात नेऊन पुन्हा अत्याचार केला.
पीडित मुलीने घटनेच्या एका आठवड्यानंतर म्हणजे 7 जून रोजी तिच्या वडिलांना हा प्रकार सांगितला. ही घटना घरी सांगितल्यानंतर तिच्या वडिलांनी आरोपी मुलाचे घर गाठले. पण, त्या मुलाच्या चुलत भावांनी त्याला पाठीशी घातले. तसेच, मुलीला आणि वडिलांना बेदम मारहाण केली. एवढेच नाही तर पोलिसात गेल्यास कुटुंबियांना जीवे मारण्याची धमकीही दिली.
मात्र, पीडित मुलीच्या वडिलांनी हिंमत करून पोलिसांत तक्रार दाखल केली. त्यांच्या तक्रारीनुसार पोलिसांनी एफआयआरमध्ये कुटुंबातील 10 जणांची नावे नोंदवली. यात आरोपीच्या 90 वर्षीय आजोबांचाही समावेश आहे.
अहर पोलिस स्टेशनचे निरोक्षक निशान सिंह यांनी तक्रारीच्या आधारे आयपीसी कलम 376 (बलात्कार), 147 (दंगल), 323 (दुखापत करणे), 504 (शांतता भंग), 505 (गुन्हेगारी धमकी) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आल्याचे सांगितले. पीडित मुलीच्या वडिलांनी दिलेल्या लेखी तक्रारीनुसार एफआयआरमध्ये नाव असलेल्या सर्व लोकांना आरोपी करण्यात आले आहे असे त्यांनी स्पष्ट केले.
एफआयआरमध्ये नाव असलेल्या सर्व लोकांचा गुन्ह्यातील सहभाग तपासला जाईल. तसेच, मृत आजोबांबाबत कुटुंबीयांनी केलेल्या दाव्याचीही पडताळणी केली जाईल. आरोपींना पकडण्यासाठी पथके तयार करण्यात आली असून छापे टाकण्यात येत आहेत असेही त्यांनी सांगितले. दरम्यान, आरोपी कुटुंबाने बुलंद शहरचे वरिष्ठ एसपी श्लोक कुमार यांची भेट घेत एफआयआरवर प्रश्न उपस्थित केले असून या प्रकरणाची निष्पक्ष चौकशी करण्याचे निर्देश एसएसपींनी दिले आहेत.