जबलपूर : प्रेमासाठी लोकं काहीही करायला तयार होतात. याचंच एक ताजं उदाहरण मध्य प्रदेशातील जबलपूरमध्ये दिसून आलं. गेल्या काही दिवसांपासून मध्य प्रदेशमध्ये मुसळधार पाऊस पडत असून त्यामुळे जनजीवन विस्कळीत झालं आहे. लग्न वगैरे कार्यक्रमांवरही त्याचा परिणाम होतोना दिसत आहे. पण अशा प्रतिकूल परिस्थितीमध्येही एका वराने त्याच्या वधूला भेटण्यासाठी जुगाड करत तिचं घर गाठलं आणि अखेर ते लग्न झालंच. याचा व्हिडीओही मोठ्या प्रमाणात शेअर होताना दिसत आहे.
मोहन पटेल असे नवरदेवाचे नाव असून तो चारगव्हाण येथील रहिवासी आहे. मोहनचे लग्न नरसिंगपूरच्या पिपरिया गावात राहणाऱ्या राधाशी ठरले होते. 28 जून रोजी हा विवाहसोहळा पार पडणार होता. लग्नासाठी मोहन त्याच्या कुटुंबियंसह पिपरिया येथे आलाही. मात्र मुसळधार पावसामुळे सगळीकडे पाणी साचले आणि त्याची कार वधूच्या घरापर्यंत पोहोचू शकली नाही. वधूच्या घरी जाण्यासाठी एक पूल पार करून जावे लागते, मात्र सतत कोसळणाऱ्या पावसामुळे तेथे गुडघाभर पाणी साचले होते.
असा पार केला पूल
मात्र मोहनने काहीही करून हे लग्न करण्याचेच ठरवले. त्यानंतर वधूच्या घराच्या बाजूला असलेल्या पुलाच्या एका टोकापासून ते दुसऱ्या टोकापर्यंत घट्ट दोरी बांधण्यात आली. पुलावर गुडघाभर पाणी असूनही नातेवाईकांनी त्यांचा जीव धोक्यात घातला आणि नवऱ्या मुलाला खांद्यावर बसवून एका टोकापासून ते दुसऱ्या टोकापर्यंत ते घेऊन गेले. याप्रमाणेच वरातीतील इतर लोकांनीही पूल ओलांडला आणि वधूच्या घरापर्यंत पोहोचले. अशा प्रकारे सर्व नातेवाईक वधूच्या घरी पोहोचले. त्यानंतर विधिवत लग्न लागले आणि वधूवरांनी सप्तपदीही घेतल्या. या घटनेचा व्हिडीओहीसोशल मीडियावर व्हायरला झाला आहे.