गांधीनगर (गुजरात) : गुजरातमध्ये कोरोना रुग्णसंख्येचा (Gujarat Corona case) आलेख चढता आहे. अहमदाबाद, सुरत, राजकोट, भावनगर, जामनगर या जिल्ह्यांमध्ये गुजरातमधील सर्वाधिक कोरोना रुग्ण आहेत. या शहरांच्या स्मशानभूमीत अंत्यसंस्कारांसाठी रांगा लागल्या आहेत. मृतांची संख्या वाढली (Gujrat corona death) असताना सरकारी खात्यांनी दिलेल्या आकडेवारीने प्रश्नचिन्ह उपस्थित केलं आहे. एका रिपोर्टनुसार, गुजरातमध्ये गेल्या 71 दिवसात तब्बल 1.23 लाख मृत्यू दाखले अर्थात डेथ सर्टिफिकेट (Death Certificate) जारी करण्यात आले आहेत. मात्र कोरोनाने मृत्यू झालेल्यांची संख्या 4218 इतकीच दाखवण्यात आली आहे. त्यामुळे लाखो मृत्यू होऊनही केवळ 4 हजार रुग्णांचा मृत्यू कोरोनाने झाल्याचं सांगणं हे न पटणारं आहे. (Gujrat corona death reported 4218 but death certificate issued 1.23 lakh question on covid19 death numbers)
गुजरातमध्ये गेल्या वर्षी झालेले मृत्यू आणि जारी करण्यात आलेले डेथ सर्टिफिकेटचे आकडे यांच्याशी तुलना करता, जे ताजे आकडे समोर आले आहेत ते दुप्पट आहेत. गुजरातमधील वृत्तपत्र दिव्य भास्करने 1 मार्च 2021 पासून 10 मे 2021 पर्यंतच्या मृत्यू दाखल्यांवरुन एक वृत्त छापलं आहे. त्यानुसार, गुजरातमधील 33 जिल्हे आणि 8 महानगरांमध्ये 71 दिवसात आतापर्यंत 1 लाख 23 हजार 871 मृत्यू दाखले जारी करण्यात आले आहेत.
यावर्षी मार्च महिन्यात राज्यात एकूण 26 हजार 026 इतके मृत्यू दाखले जारी करण्यात आले. एप्रिलमध्ये त्यामध्ये वाढ होऊन ही संख्या 57,796 वर पोहोचली. तर मे महिन्याच्या 10 दिवसातील आकडा 40,051 इतका आहे.
शहर कोरोनाने मृत्यू मृत्यू दाखले
अहमदाबाद 2126 13593
सूरत 1074 8851
राजकोट 288 10887
वडोदरा 189 7722
भावनगर 134 4158
मागील वर्षी आणि यावर्षी जे मृत्यू दाखले जारी करण्यात आले आहेत, त्यांची तुलना करता भयावह स्थिती दिसते. मार्च 2020 मध्ये 23 हजार 352, एप्रिल 2020 मध्ये 21 हजार 591 आणि मे 2020 मध्ये 13125 मृत्यूंची नोंद झाली होती. मात्र यावर्षी म्हणजे 2021 मध्ये जे आकडे समोर आले आहेत ते दुपटीपेक्षा जास्त आहेत. 71 दिवसात 1 लाख 23 हजार 871 मृत्यू दाखले जारी करण्यात आले आहेत. यापैकी केवळ 4218 जणांचा मृत्यू हा कोरोनाने झाल्याची नोंद गुजरात सरकारने केली आहे.
दरम्यान, गुजरातमध्ये कोरोना रुग्णसंख्या आणि मृत्यूसंख्या लपवली जात असल्याचा आरोप होत आहे. त्यावर मुख्यमंत्री विजय रुपाणी यांनी काही दिवसापूर्वी स्पष्टीकरण दिलं होतं. त्यानुसार, सरकार आकडे लपवत नाही तर अन्य व्याधींनी झालेल्या मृतांची नोंद कोरोनामध्ये समाविष्ट केली जात नाही, असं रुपाणी म्हणाले होते. मुख्यमंत्र्यांच्या वाक्याचा सोपा अर्थ म्हणजे, जर एखाद्या व्यक्तीला कोरोना झाला असेल आणि तो डायबिटीज म्हणजे मधुमेह, हृदयरोग किंवा किडनी अशा आजारांशी त्रस्त असेल, तर त्याच्या मृत्यूची नोंद कोरोनामुळे झाल्याचं म्हटलं जाणार नाही.
संबंधित बातम्या
गुजरातच्या इशाऱ्यावरून महाराष्ट्राला बदनाम करण्याचे काम; नाना पटोले यांचा आरोप
धक्कादायक! कोरोनानं वडिलांच्या निधनानंतर संपूर्ण कुटुंबाची सामूहिक आत्महत्या
(Gujrat corona death reported 4218 but death certificate issued 1.23 lakh question on covid19 death numbers)