वाराणासी: ज्ञानवापी मशीद (Gyanvapi Masjid Case) प्रकरणी कोर्ट (court) आज आणखी एका याचिकेवर सुनावणी करणार आहे. माजी कोर्ट कमिश्नर अजय कुमार मिश्रा यांनी तयार केलेला सर्व्हे अहवाल गृहित धरण्यात यावा, अशी मागणी हिंदू पक्षकारांच्या याचिकाकर्त्यांनी केली आहे. मिश्रा यांच्यावर अहवाल लीक केल्याचा आरोप होता. त्यामुळे त्यांना पदावरून हटवण्यात आलं आहे. मात्र, मिश्रा यांच्या दोन पानी अहवालात मशिदीच्या भिंतीवर शेषनागाची कलाकृती असल्याचा दावा करण्यात आला आहे. याशिवाय खंडित देववग्रह, मंदिराचा ढिगारा, हिंदू देवदेवतांसह कमळाची आकृतीही शिलालेखांवर असल्याचं सांगण्यात येत आहे. त्यामुळे कोर्ट हा अहवाल ग्राह्य धरणार का? याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. तर दुसरीकडे न्यायालयाचे आयुक्त विशाल सिंह (vishal singh) यांनी ज्ञानवापी मशिदीतील 15 पानी अहवाल न्यायालयासमोर सादर केला आहे. हा अहवाल सीलबंद असून तो रवीकुमार दिवाकर यांच्या न्यायालयात सादर करण्यात आला आहे. सोबत तीन सीलबंद बॉक्सेस आहेत. ज्यात आतील व्हिडीओ रेकार्डिंग, फोटो, मेमरी चीप, आणि इतर साहित्य आहे. त्यामुळे या अहवालाकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.
सहायक अॅडव्होकेट कमिश्नर अजय प्रताप सिंह यांनीही कोर्टात अहवाल सादर केल्याचं सांगितलं आहे. एकूण 12 पानांचा हा अहवाल आहे. हा अहवाल तयार करण्यासाठी आपण आणि विशाल सिंह यांनी खूप मेहनत घेतली. मात्र, अहवालात काय आहे हे सांगण्यास त्यांनी नकार दिला.
आम्ही रात्रभर जागून हा अहवाल तयार केला आहे. रिपोर्ट तयार करताना कालखंडाकडे विशेष लक्ष देण्यात आलं आहे. हा अहवाल करण्यासाठी एक हजाराहून अधिक फोटो, अनेक तासांचे रेकॉर्डिंग करण्यात आलं आहे. तसेच माजी कोर्ट कमिश्नर अजय मिश्रा यांनी जो अहवाल सादर केला होता. त्यातील महत्त्वाच्या गोष्टींवरही लक्ष देण्यात आलं आहे.
अजय मिश्रा यांना पदावरून हटवण्यात आल्याबद्दल त्यांनी दु:ख व्यक्त केलं. आम्हाला त्यांची उणीव भासत आहे. आमचा रिपोर्ट पाहून कोर्ट त्यावर निर्णय देईल. कोर्टाचा जोही आदेश येईल, त्याचं आम्ही पालन करू, असं त्यांनी सांगितलं. मात्र, रिपोर्टवर काहीही बोलण्यास त्यांनी नकार दिला.
यापूर्वी माजी कोर्ट कमिश्नर अजय मिश्रा यांनी दोन दिवसात रिपोर्ट तयार केला होता. त्यांच्या रिपोर्टमध्ये अनेक तथ्य मांडण्यात आली होती. त्यांच्या रिपोर्टनुसार मशिदीतील ढिगाऱ्यावर देवी देवतांच्या कलाकृती आहेत. अन्य शिलालेखांवर कमळाची कलाकृती दिसली. उत्तर पश्चिमेकडील कोपऱ्यात सीमेंटच्या चबूतऱ्याचं काम झालं आहे. तर उत्तरेपासून पश्चिमेकडील मध्यावरील शिलालेखावर शेषनागाची कलाकृती आहे.
ज्ञानवापीच्या शिलालेखावर भगव्या रंगात निर्माण करण्यात आलेली कलाकृती आहे. त्याची व्हिडीओग्राफी करण्यात आली आहे. शिलालेखावर देव विग्रह आहे. त्यात चार मूर्त्यांची अस्पष्ट आकृती दिसत आहे. त्यावर भगवा रंग लागलेला आहे. चौथी आकृती मूर्तीसारखी दिसते. मात्र त्यावर भगवा लेप लावण्यात आला आहे, असं मिश्रा यांच्या रिपोर्टमध्ये नमूद करण्यात आलं आहे.