मुंबई : देशात हवामान (Weather Update) बदलाचा परिणाम अनेकांनी ठिकाणी पाहायला मिळत आहे. काल राजस्थान (Rajsthan Climate Change) राज्यात अवकाळी पावसाने मुसळधार हजेरी लावली. त्यामुळे राज्यातील काही ठिकाणचं तापमान नऊ अंशांनी सामान्यपेक्षा कमी झाल्याची नोंद झाली आहे. वातावरणात अचानक बदल झाल्यामुळे नागौरच्या देह, रोल, तरनाळ या भागात मुसळधार पाऊस (Today heavy Rain Update) झाला आहे. सगळीकडे गारा पडल्या असल्यामुळे काश्मीर सारखं चित्र तिथल्या रहिवाशांना पाहायला मिळालं. शेतात गारांचा जोरात मारा पाहायला मिळाला. विशेष म्हणजे काश्मीर भागात ज्या पद्धतीने बर्फवृष्टी होते, तसंच दृष्ट पाहायला मिळाल्याचं अनेकांनी सोशल मीडियावर सांगितलं आहे.
मांगलोद गावात राहणाऱ्या रामेश्वर दंतुससिया यांनी सांगितले की, काल झालेल्या वादळी पावसामुळे आणि गारपीटीमुळे अनेकांच्या घराचे मोठे नुकसान झाले आहे. विशेष म्हणजे घरावरील छप्पर उडून गेले आहे, एवढं मोठं वादळ झालं आहे की, परिसरातील पशु-पक्षी सुध्दा जखमी झाले आहेत. तिथले शिक्षक गोपाल छाबा यांनी सांगितले की, ज्यावेळी ते शाळेतून त्यांच्या घरी जात होते. त्यावेळी मंगलोडजवळील पिडियारा परिसरात जोरदार गारपीट झाली. राजस्थानमधील 31 जिल्ह्यांमध्ये 5 मे पर्यंत यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.
राजस्थान राज्यातील हवामान खात्याने आज सुद्धा अनेक ठिकाणी पावसाची शक्यता व्यक्त केली आहे. राजस्थानमध्ये उत्तर आणि पूर्व भागात उद्या मुसळधार अवकाळी पावसाची शक्यता व्यक्त केली आहे. 2 मे पासून आणखी एक नवीन वेस्टर्न डिस्टर्बन्स सक्रिय झाल्याने, 2-3 मे रोजी पुन्हा एकदा नवा वादळाची शक्यता आहे.
यावर्षी उन्हाळ्यात आणि हिवाळ्यात मोठ्या प्रमाणात अनेक राज्यात पाऊस झाला आहे. विशेष म्हणजे झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे. महाराष्ट्रात खरीप आणि रब्बी दोन्ही हंगामात पावसामुळे शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे.