मुंबई : सध्या भारताचे माजी सॉलिसिटर जनरल आणि प्रसिद्ध वकील हरीश साळवे चांगलेच चर्चेत आहेत. हरीश साळवे हे त्यांच्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत आले आहेत. साळवे यांनी वयाच्या 68 व्या वर्षी तिसरं लग्न केलं आहे. त्यांनी लंडनमध्ये त्रिनासोबत लग्नगाठ बांधली. त्यामुळे सध्या सोशल मीडियावर हरीश आणि त्रिना यांच्या लग्नाच्या चर्चा सुरू आहेत. या दोघांच्या विवाह सोहळ्याला अनेक दिग्गजांनी हजेरी लावली होती. यामध्ये सुनील मित्तल, नीता अंबानी, ललित मोदी यांचा समावेश आहे. दरम्यान, सगळ्यात महागडे वकिल म्हणून ओळखले जाणारे हरीश साळवे साळवे यांची फी तुम्हाला माहिती आहे का? फीचा आकडा वाचून तुम्ही नक्कीच चकीत व्हाल.
हरीश साळवे हे एक केस लढण्यासाठी लाखो रूपये घेतात. त्यामुळे त्यांना महागडे वकील म्हणून ओळखलं जातं. पण त्यांनी एका केससाठी फक्त 1 रूपये घेतले होते. हे ऐकून तुम्हाला नक्कीच धक्का बसला असेल, पण होय हे खरं आहे. 1999 ते 2002 पर्यंत हरीश साळवे हे भारताचे सॉलिसिटर जनरल होते. आंतरराष्ट्रीय न्यायालयात कुलभूषण जाधव यांचा खटला लढला होता. यासाठी त्यांनी फक्त 1 रूपये फी घेतली होती. याबाबतची माहिची परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांनी ट्विट करून दिली होती.
कुलभूषण जाधव यांना हेरगिरीच्या आरोपाखाली पाकिस्ताननं फाशीची शिक्षा सुनावली होती. त्यावेळी कुलभूषण जाधव हे हेर असल्याचं सिद्ध करण्यासाठी पाकिस्ताननं त्यांच्या वकिलावर 20 कोटींहून अधिक खर्च केला होता. तर दुसरीकडे हरीश साळवे यांनी भारत सरकारकडून फक्त 1 रूपये फी घेतली होती. विशेष म्हणजे साळवेंनी पाकिस्तानला पराभूत करून मोठं यश मिळवलं होतं.
बिझनेस टुडेनं दिलेल्या वृत्तानुसार, एका खटल्याच्या सुनावणीसाठी हरीश साळवे 6 ते 15 लाख रूपये फी घेतात. त्यामुळे त्यांना देशातील महागड्या वकीलांपैकी एक म्हणून ओळखलं जातं. तसंच साळवे यांचा अनेक मोठ्या प्रकरणांशी संबंध आहे. त्यांनी अभिनेता सलमान खानची हिट अँड रन केस देखील लढवली होती. तसेच ते टाटा, अंबानी आणि मंहिद्रा यांसारख्या बड्या कॉर्पोरेट घराण्यांचे वकिली करतात.