हेमंत सोरेन यांचा खेळ संपला, आता ED चा फास आणखी कोणावर आहे ? यादी भली मोठी आहे

| Updated on: Feb 01, 2024 | 7:06 PM

केंद्र सरकारच्या तपास यंत्रणा ईडी आणि सीबीआय यांनी विविध राज्यातील आजी आणि माजी मुख्यमंत्र्यांना सळो की पळो करुन सोडले आहे. झारखंड मुक्ती मोर्चाचे नेते हेमंत सोरेन यांना बुधवारी अटक झाल्यानंतर त्यांनी मुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिला आहे. देशातील विरोधी पक्षांतील कोणत्या आजी आणि माजी मुख्यमंत्र्यांची चौकशी सुरु आहे ते पाहुयात....

हेमंत सोरेन यांचा खेळ संपला, आता ED चा फास आणखी कोणावर आहे ? यादी भली मोठी आहे
ed
Image Credit source: TV9MARATHI
Follow us on

नवी दिल्ली | 1 फेब्रुवारी 2024 : अंमलबजावणी संचालनालय अर्थात ईडी (Enforcement Directorate) मुळे सध्या राजकीय लोकांची झोप उडाली आहे. कोणत्या राज्याचा मुख्यमंत्री असो किंवा व्यावसायिक एकदा ईडीच्या रडारावर आल्यावर त्यांची अवस्था वाईट होत आहे. बुधवारी झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांना ईडीने अटक केली. कथित जमिन घोटाळ्यात त्यांना मनी लॉण्ड्रींग केस अंतर्गत ईडीने अटक केली आहे. सोरेन यांच्या अटकेने अनेक राजकारण्यांची भीतीने गाळण उडाली आहे. ईडीने अनेक राजकीय पक्षांच्या नेत्यांविरोधात मोहीम उघडली आहे. यातील काही चेहरे आजी मुख्यमंत्री आहेत तर काही माजी मुख्यमंत्री आहेत. विरोधी पक्षातील कोणकोणाविरोधात ईडीची चौकशी सुरु आहे ते पाहूयात…

दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना ईडीने बुधवारी पाचवे समन्स पाठविले आहे. केजरीवाल यांना अबकारी खात्यातील धोरणाबद्दल चौकशीसाठी बोलावले आहे. नवीन अबकारी धोरणामुळे प्रायव्हेट प्लेअरना फायदा पोहचवला गेला आहे. या प्रायव्हेट प्लेअरनी 100 कोटीची लाच दिल्याचाही ईडीचा आरोप आहे. आतापर्यंत केजरीवाल यांनी ईडीच्या समन्सला दाद दिलेली नाही. छत्तीसगडचे माजी मुख्यमंत्री भुपेश बघेल ईडीने तीन प्रकरणे दाखल केली आहे. कोळसा वाहतूक, दारुच्या दुकानांचे नियमन आणि महादेव गेमिंग एप अशा तीन प्रकरणात ही चौकशी सुरू आहे. बिहारचे माजी मुख्यमंत्री लालूप्रसाद यादव आणि त्यांची पत्नी राबडी देवी, त्यांचा मुलगा माजी उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव तिघांमागे ईडीचा ससेमिरा लागला आहे. तिघेही जण कथित IRCTC घोटाला, लॅंड फॉर जॉब प्रकरणात मुख्य आरोपी आहेत. आयआरसीटीसी हॉटेल प्रकरण 2017 चे लालू मुख्यमंत्री असतानाचे आहे. 2022 चे लॅंड फॉर जॉब प्रकरण रेल्वेत नोकरीच्या बदल्यात प्लॉट घेण्याशी संबधित आहे.

राजस्थानचे माजी मुख्यमंत्री अशोक गहलोत, तसेच उपमुख्यमंत्री सचिन पायलट आणि कॉंग्रेसचे खासदार कार्ति चिदंबरम यांचे नाव राजस्थान एम्ब्युलन्स घोटाळ्यात आहे. ही केस 2010 मध्ये Ziqitza healthcare ला 108 एम्ब्युलन्स चालविण्याचे कंत्राट अवैध प्रकार दिल्याची आहे. पायलट आणि चिदंबरम कथित रुपात या कंपनीचे डायरेक्टर होते. याशिवाय हरियाणाचे माजी मुख्यमंत्री भूपिंदर सिंह हुड्डा, कॉंग्रेस वरिष्ठ नेते मोतीलाल वोरा, उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री अखिलेश यादव, युपीच्या माजी मुख्यमंत्री मायावती यांच्या विरोध ईडीने थेट केस दाखल केलेली नाही. परंतू त्यांच्या अनेक प्रकरणाची चौकशी सुरु आहे.

शरद पवारही रडारवर

केरळचे मुख्यमंत्री पिनाराई विजयन, तेलंगणाचे नवीन सीएम रेवंत रेड्डी यांच्याविरोधात ईडीची चौकशी सुरु आहे.आंध्रप्रदेशचे मुख्यमंत्री वायएस जगन मोहन रेड्डी यांच्यावरही युपीए काळातील अनेक प्रकरणे दाखल आहेत. गुजरात माजी मुख्यमंत्री शंकर सिंह वाघेला, राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार, त्यांचे पुतणे अजित पवार यांच्या विरोधात ईडीने केस दाखल केली होती. अजित पवार आता उपमुख्यमंत्री झाले आहेत. जम्मू-कश्मीरचे माजी मुख्यमंत्री फारुक अब्दुल्ला, त्यांचे पूत्र माजी मुख्यमंत्री उमर अब्दुल्ला, माजी मुख्यमंत्री महबुबा मुफ्ती, अरुणाचलचे माजी मुख्यमंत्री नबाम तुकी, मणिपुरचे माजी मुख्यमंत्री ओकराम इबोबी सिंग आदींची ईडी आणि सीबीआय अशा तपास यंत्रणाकडून चौकशी झाली आहे किंवा सुरु आहे.

केंद्र सरकारवर आरोप

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सरकार केंद्रीय यंत्रणांचा दुरुपयोग केल्याचा आरोप विरोधी पक्ष कायम लावत आला आहे. बुधवारी हेमंत सोरेन यांना ईडीने अटक केल्यानंतर कॉंग्रेस नेता राहुल गांधी यांनी ट्वीट केले होते. त्यात ED, CBI, IT आदी आता सरकारी एजन्सी राहील्या नसून भाजपाच्या विरोधी पक्ष मिठाओ सेल बनल्या आहेत. स्वत: भ्रष्टाचारात बुडालेली भाजपा सत्तेच्या नशेत लोकशाही नष्ट करण्याची मोहीम चालवित आहे असा आरोप राहुल गांधी यांनी केला आहे.