मुंबई | 8 जानेवारी 2024 : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा लक्षद्वीप दौरा आणि त्यानंतरच्या घडामोडींनी लक्षद्वीप चर्चेत आहे. आता लक्षद्वीप येथील पंतप्रधान मोदी यांची छायाचित्रे तेथील पर्यटनासाठी प्रेरणादायी ठरली आहेत. मालदीवच्या मंत्र्यांनी त्यावर आक्षेपार्ह टीपण्णी केल्यानंतर त्यांची गच्छती झाल्यानंतर भारताची बाजू वरचढ ठरली आहे. लक्षद्वीप आता भारताचा केंद्रशासित प्रदेश असला तरी स्वातंत्र्य मिळविताना फाळणीच्या वेळी हा मुस्लीम बहुल भाग म्हणून पाकिस्तानच्या त्यावर डोळा होता. पाकिस्तान आपला युद्धनौका देखील लक्षद्वीप गिळंकृत करण्यासाठी धाडल्या, परंतू सरदार वल्लभभाई पटेल यांनी त्यांचा डाव हाणून पाडला.
भारत-पाकिस्तान फाळणीदरम्यान पाकिस्तानचे जनक मोहम्मद अली जिना यांना हैदराबाद, काश्मीर आणि जुनागढ मुस्लीम बहुल असल्याने पाकिस्तानला जोडले जावे असे वाटते होते. सरदार पटेल यांच्या धाडसी नेतृत्वाने ही संस्थाने भारतात अखेर विलीन झाली. जेव्हा हे मोठे प्रांत भारतात जोडले जात होते. तेव्हा लक्षद्वीप बेटांचा समूह वेगळा राहीला होता. दूर असल्याने या लक्षद्वीपवर दोन्हीही देशांची नजर पटकन गेली नाही. दोन्ही देश भाषावार प्रांत प्रमाणे मुख्य भारतीय खंडाशी जोडलेले भूमी जोडायच्या मागे लागले होते. सरदार पटेल यांनी त्यांच्या दूरदर्शीपणा आणि धाडसी कारवाईने जवळपास 500 संस्थानांना भारताशी जोडले. 1947 ऑगस्टच्या अखेरचा काळ असावा तेव्हा दोन्ही देशांची लक्षद्वीपवर नजर गेली. व्यापार आणि व्यवसाय आणि समुद्री सुरक्षेसाठी हे बेट ताब्यात असणे गरजेचे होते.
लक्षद्वीपवर मुस्लीमांची संख्या जादा असल्याने पाकिस्तानने त्यावर कब्जा करण्यासाठी कारवाईस प्रारंभ केला. त्यावेळी सरदार पटेल यांचेही तिकडे लक्ष होते. पाकिस्तानने तेथे कारवाई सुरु करण्यापू्र्वीच सरदार पटेल यांनी दक्षिणेत संस्थानातील मुदालियर बंधूंना सैन्य घेऊन लागलीच तेथे पोहचण्यास सांगितले. त्यानंतर दक्षिण संस्थानाचे रामास्वामी आणि लक्ष्मण स्वामी मुदालियर हे तेथे सैन्य घेऊन पोहचले आणि त्यांनी तेथे तिरंगा फडकवला. वेगवेगळ्या वेबसाईट्सच्या वृत्तानूसार जेव्हा भारताचे सैन्य तेथे पोहचले तेव्हा काही वेळाने पाकिस्तानची युद्धनौका देखील तेथे पोहचली, परंतू भारताचा झेंडा फडकलेला पाहून तेथे परत मागे फिरली. त्याच प्रमाणे लक्काद्वीप, मिनिकॉय आणि अमीनदीवी बेटे देखील भारतात सामील झाली.
लक्षद्वीपच्या मिनिकॉय भागावर म्हैसूरचा राजा टीपू सुल्तानचे देखील साम्राज्य होते. साल 1799 मध्ये टीपूच्या हत्येनंतर हे बेट ब्रिटीशांच्या ताब्यात गेले. त्यानंतर भारताच्या स्वातंत्र्यानंतर हे बेट 1956 मध्ये केंद्र शासीत प्रदेश झाला. भाषावार प्रांत रचनेत हे बेट आधी मद्रास रेजिडेंसी ऑफ इंडीयाला जोडले गेले. कारण तेव्हा बेटावर दक्षिण राज्यातील भाषा बोलली जात होती. साल 1971 मध्ये त्याचे नाव लक्षद्वीप करण्यात केले.
येथील समुद्रातील पाणी इतके नितळ आहे की येथे समुद्री कासवाची शिकार आरामात केली जायची. हे बेट आणि बिच देखील खूपच सुंदर असून येथे व्यापाऱ्यासाठी आलेल्या ख्रिस्ती मिशनरी आणि अरब व्यापाऱ्यांमुळे येथे धार्मिक परिवर्तन झाले. त्यामुळे आधी हिंदू आणि बौद्ध असलेल्या लोकसंख्येने इस्लाम धर्म स्वीकारला. 11 व्या शतकात येथे इस्लामीकरण झाले. येथील 95 टक्के लोकसंख्या मुस्लीम आहे.
हा भारताचा हिस्सा असला तरी येथे प्रवेश करण्यासाठी आपल्या राज्यांना येथील प्रशासनाची परवानगी घ्यावी लागते. लक्षद्वीप टुरिझम वेबसाईटच्या मते येथील आदिवासी समुहाची सुरक्षा आणि संस्कृती वाचविण्यासाठी येथे प्रवेश करण्यासाठी परमिटची गरज बंधनकारक केली आहे.