गाईला मिठी मारायची कशी? सोशल मीडियातून टीकेची झोड; अखेर केंद्राने घेतला ‘हा’ निर्णय

| Updated on: Feb 10, 2023 | 7:47 PM

केंद्राच्या पशू कल्याण मंडळाने गाईला मिठी मारण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर या निर्णयावर सोशल मीडियातून जोरदार टीका झाली. आता केंद्राच्या पशू कल्याण मंडळाला हा निर्णय मागे घ्यावा लागला.

गाईला मिठी मारायची कशी? सोशल मीडियातून टीकेची झोड; अखेर केंद्राने घेतला हा निर्णय
Follow us on

नवी दिल्ली : जगभरात अनेकांना व्हॅलेंटाईन डेचे (Valentine’s Day) वेध लागले. केंद्राने पशू कल्याण मंडळानं (Animal Welfare Board) मार्गदर्शक पत्रक जाहीर केलं. त्यानुसार, गाईप्रेमींनी १४ फेब्रुवारीला देशभरात गाईला मिठी मारा दिवस साजरा करण्याचं आवाहन केलं. मंडळाने यासाठी वैदिक परंपरेचा ( Vedic Traditions) दाखला दिला. केंद्राच्या पशू कल्याण मंडळाने १४ फेब्रुवारीला गाईला मिठी मारण्याचा निर्णय घेतला होता. त्यानंतर या निर्णयावर सोशल मीडियातून जोरदार टीका झाली. आता केंद्राच्या पशू कल्याण मंडळाला हा निर्णय मागे घ्यावा लागला. गाईला मिठी मारा या केंद्र सरकारच्या निर्णयावर विरोधकांनी चांगलीच टोलेबाजी केली.

गाईने लाथ मारली तर…

काऊ हग म्हणजे गाईला मिठी मरा. पशू कल्याण मंडळाचं डोकं फिरलं का, असा सवाल अजित पवार यांनी विचारला. गाईला मिठी मारत नाही. गाईला आपण गोंजारत असतो. गाईला चारा देत असतो. आपण मिठी मारली आणि गाईने लाथ मारली तर… काही पण निर्णय घेता का, असंही अजित पवार यांनी पशू कल्याण मंडळाला सुनावलं.

मिठी कशी मारायची प्रॅक्टिकल सांगा

जितेंद्र आव्हाड म्हणाले, शासनानं १४ फेब्रुवारीला गाईला मिठी मारा असा निर्णय घेतला. मग, गाई कुठं उभ्या करणार आहेत का. याठिकाणी चार गाई उभ्या करणार. ज्यांना मिठ्या मारायच्या असतील त्यांनी गाईला मिठ्या माराव्यात. गाईला मिठी मारताना अडचणी येतात.

आपण मिठी मारली तर ती समोरून शिंग मारणार किंवा मागेहून लाथ मारणार. गाईचे पोट इतकं मोठं असतं की, तिला मिठीचं मारता येत नाही. प्राक्टिकल तुम्हाला दाखवावी लागेल की, मिठी कशी मारायची, असा प्रश्न जितेंद्र आव्हाड यांनी उपस्थित केला.

सोशल मीडियावरून टीका

पशू कल्याण मंडळाने जारी केलेल्या पत्रकानुसार, गाय ही भारतीय संस्कृतीचा आणि ग्रामीण अर्थव्यवस्थेचा कणा आहे. गाईला गोमाता म्हणून पाहिलं जातं. गाईला मिठी मारल्यास भावनिक समृद्धी मिळू शकते, असं म्हटलं होतं.

पण, याला सर्व स्तरातून विरोध होऊ लागला. सोशल मीडियावरून मोठ्या प्रमाणात टीका करण्यात आली. गाईवर प्रेम करणाऱ्या नागरिकांनी १४ फेब्रुवारीला गाईला मिठी मारावी. आपले जीवन आनंदी बनवावे, असे आवाहन पशु कल्याण मंडळाने केले होते.  त्यानंतर केंद्र सरकारने हा निर्णय मागे घेतला. दोन दिवसांतचं पशू कल्याण मंडळाला माघार घ्यावी लागली.