झाशी | 4 जानेवारी 2024 : आयुष्य किती क्षणभंगुर आहे. एका क्षणी आपण आनंदात असतो, पण पुढल्या क्षणी काय होईल सांगता येत नाही. याचाच प्रत्यय साबरमती एक्स्प्रेसमधील प्रवाशांना आला. स्लीपर कोचमधील प्रवाशांनी तब्बल 13 तास एका मृतदेहासोबत प्रवास केला. 13 तासांनी ट्रेन झाशीला पोहोचल्यावर तो मृतदेह कोचमधून उतरवण्यात आला. त्यानंतर जीआरपीने कारवाई सुरू केली. धक्कादायक गोष्ट म्हणजे ते संपूर्ण 13 तास त्या मृत इसमाची पत्नी त्याच्यासोबत प्रवास करत होती, पण आपल्या पतीचा मृत्यू झाल्याचे तिच्या लक्षातच आले नाही.
ही धक्कादायक आणि हादरवणारी घटना अहमदाबाद येथून अयोध्येला जाणाऱ्या साबरमती एक्स्प्रेसच्या (Sabarmati Express) स्लीपर कोचमध्ये घडली. रामकुमार असे मृत इसमाचे नाव असून खरंतर ते, त्यांची पत्नी, लहान मुलं आणि एका मित्रासह सुरतहून अयोध्येला जात होते. या प्रवासादरम्यान त्याला ट्रेनमध्येच झोप लागली. मात्र अनेक तास उलटूनही तो न उठल्याने शेजारी बसलेल्या लोकांना संशय आला. त्याला हलवले, उठवण्याचा प्रयत्न केला, पण तोपर्यंत बराच उशीर झाला होता. त्या इसमाचे श्वास थांबले होते, प्रवासातच त्याचा मृत्यू झाल्याचे समोर आले.
नवरा मरून पडला, 13 तास पत्नी शेजारी बसून होती
साबरमती एक्स्प्रेसच्या S-6 क्रमांकाच्या स्लीपर कोचच्या सीट क्रमांक 43, 44, 45 वर रामकुमार हे त्यांची पत्नी, दोन मुलं आणि साथीदार सुरेश यादव यांच्यासह प्रवास करत होते. रामकुमार हे मूळचे अयोध्येतील इनायत नगर येथील मजलाई गावचे रहिवासी होता. ते सुरतहून अयोध्येला जाणाऱ्या ट्रेनमध्ये बसले होते. त्यांचा मित्र सुरेश याच्या सांगण्यानुसार, प्रवासादरम्यान रामकुमार यांना रात्री झोप लागली होती. मंगळवारी सकाळी आठ वाजण्याच्या सुमारास सुरेशकुमार यांनी रामकुमार यांना उठवण्याचा प्रयत्न केला पण ते काही उठले नाहीत.
तेव्हा त्यांनी चेक केलं असता, रामकुमार यांच्या हृदयाची धडधड थांबली होती. त्यावेळी, रामकुमारची पत्नी आणि मुले त्यांच्यासोबत होती, त्यामुळे सुरेशकुमार यांनी लगेच काहीच सांगितलं नाही. प्रवासातच ही गोष्ट समोर आली असती तर ट्रेनमध्ये गोंधळ झाला असता. त्यामुळे सुरेशकुमार यांनी रामकुमार यांच्या मृत्यूबाबत कोणतीही माहिती दिली नाही. अखेर रात्री 8.30 वाजता ट्रेन झाशी रेल्वे स्टेशनवर पोहोचली तेव्हा जीआरपीच्या मदतीने रामकुमारचा मृतदेह ट्रेनमधून बाहेर काढण्यात आला. तेथे पोलिसांनी मृतदेहाचा पंचनामा करून शवविच्छेदनासाठी पाठवला.
मृताच्या शोकाकुल पत्नीने काय सांगितलं ?
या घटनेमुळे रामकुमार यांची पत्नी आणि मुलांवर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. पतीच्या अकस्मात निधनाने त्यांची पत्नी प्रेमाही ही शोकाकुल झाली आहे.रडता रडताच तिने सांगितलं की, आम्ही 8 वाजता त्यांना उठवलं पण ते काहीच बोलले नाहीत. त्यांचं अंग तर गरम लागत होत, त्यामुळे आम्हाला काहीच समजल नाही. आम्ही त्यांना उठवायचा बराच प्रयत्न केला, पण ते काही उठले नाहीत. आम्हाला वाटलं ते गाढ झोपले आहेत, पण त्यांना तर कायमचीच झोप लागली.