ग्वाल्हेर : मध्यप्रदेशातील ग्वाल्हेरमधील हे विचित्र प्रकरण आहे. भोपाळचा रहिवासी असलेल्या एका अभियंत्याचे ग्वाल्हेरच्या मुलीसोबत 1981 मध्ये लग्न झाले. पण, लग्नाच्या चार वर्षानंतरही तिला मुलबाळ होत नसल्याने त्यांनी वेगळे होण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे जुलै 1985 मध्ये पतीने भोपाळ न्यायालयात घटस्फोटासाठी अर्ज केला. मात्र, त्याचा हा दावा फेटाळण्यात आला. त्यामुळे पतीने पुन्हा विदिशा कोर्टात घटस्फोटासाठी अर्ज केला.
अभियंत्याच्या पत्नीने डिसेंबर 1989 मध्ये ग्वाल्हेर येथील कुटुंब न्यायालयात नाते संबंध पूर्ववत करण्यासाठी अर्ज दाखल केला. पती पत्नीने एकमेकांविरुद्ध केलेल्या अपीलांमुळे हे प्रकरण बराच काळ न्यायालयात फिरत राहिले. ही प्रतीक्षा इतकी लांबली की आता त्या अभियंत्याच्या दुसऱ्या पत्नीपासून झालेल्या दोन मुलांचीही लग्ने झाली आहेत.
पत्नीपासून घटस्फोट मिळावा यासाठीचा हा खटला भोपाळ कोर्टातून सुरू झाला. यानंतर विदिशा फॅमिली कोर्ट, ग्वाल्हेरचे फॅमिली कोर्ट, नंतर हायकोर्ट आणि नंतर सुप्रीम कोर्टात हे प्रकरण गेले.
पतीच्या याचिकेवर भोपाळ न्यायालयाने पतीला घटस्फोट घेण्याचा अधिकार मान्य करत त्याच्या बाजूने निर्णय दिला. मात्र, त्या आदेशाविरोधात पत्नीने अपील केले. तिची बाजु मान्य करत 2000 मध्ये पतीचा घटस्फोटाचा खटला न्यायालयाने फेटाळला. त्याविरोधात पतीने सर्वोच्च न्यायालयात एसएलपी दाखल केली.
पतीचा एसएलपी सुप्रीम कोर्टाने 2008 मध्ये फेटाळला. त्यामुळे पतीने पुन्हा 2008 मध्ये घटस्फोटासाठी अर्ज केला. जुलै 2015 मध्ये विदिशा कोर्टाने पतीचा अर्ज फेटाळला. त्यानंतर त्यांनी उच्च न्यायालयाच्या ग्वाल्हेर खंडपीठात अपील दाखल केले. अखेर 38 वर्षांच्या प्रतीक्षेनंतर दोघांनी उच्च न्यायालयातून एकमेकांच्या संमतीने घटस्फोट घेतला.
38 वर्षांच्या कायदेशीर लढाईनंतर अखेर पती आणि त्याची पहिली पत्नी विभक्त झाली. उच्च न्यायालयाने त्या अभियंत्याला घटस्फोटाच्या बदल्यात पत्नीला 12 लाख रुपये पोटगी देण्याचे आदेश दिले आहेत. ते बारा लाख रुपये एकरकमी द्यावेत, अशा सूचनाही उच्च न्यायालयाने दिल्या आहेत.
अभियंता पती आणि त्याची पत्नी दोघे वेगळे राहत होते. 1990 मध्ये पतीने दुसरे लग्न केले. दरम्यान तो अभियंताया सेवानिवृत्त झाला. त्याला दुसऱ्या पत्नीपासून दोन मुले झाली. ती मुलेही देखील विवाहित आहेत.
घटस्फोटित महिलेचे वडील पोलिसात अधिकारी होते. मुलीचे संसार मोडू नये अशी त्यांची इच्छा होती. त्यामुळे घटस्फोट रोखण्यासाठी महिला वारंवार न्यायालयात दाद मागत होती. मात्र, महिलेच्या भावांच्या समजुतीनंतर पती पत्नीने संमतीने घटस्फोट घेतला.