नवी दिल्ली | 21 फेब्रुवारी 2024 : देशातील श्रीमंत व्यक्तींचा उल्लेख आला की आपोआप अंबानी, अदानी, टाटा, बिर्ला यांची नावे पुढे येतात. परंतु, भारतातील या व्यक्तीकडे इतकी संपत्ती आहे की त्याचे आकडे पहिले तरी डोके चक्रावून जाईल. या श्रीमंत व्यक्तीकडे तब्बल ₹ 1,74,79,55,15,00,000 (17.47 लाख कोटी, $230 अब्ज ) पेक्षा जास्त संपत्ती आहे. त्यांच्याकडे हिऱ्यांचा अतुलनीय संग्रह होता. पेपरवेट म्हणून ते हिऱ्यांचा वापर करत असे. ही व्यक्ती आहे हैदराबादचा निजाम मीर उस्मान अली खान. संपत्तीच्या बाबतीत त्यांच्या आसपासही कुणी फिरकू शकत नाहीत हे वास्तव आहे.
निजाम मीर उस्मान अली खान यांनी 1911 ते 1948 पर्यंत 37 वर्षे हैदराबादवर राज्य केले. आजही मीर उस्मान अली खान यांच्याइतका श्रीमंत देशात कोणी झाला नाही. जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती बर्नार्ड अर्नॉल्ट यांनाही त्यांनी श्रीमंत व्यक्तींच्या क्रमवारीत मागे टाकले आहे. बर्नार्ड अर्नॉल्ट आणि त्याच्या कुटुंबाची एकूण संपत्ती ही जवळपास 221 अब्ज डॉलर इतकी आहे. तर, मीर उस्मान अली खान यांची संपत्ती ही 230 अब्ज डॉलर इतकी होती.
हैदराबादचे निजाम उस्मान यांच्या कारकिर्दीत गोलकोंडा येथील खाणी हे त्यांच्या कमाईचे एक महत्त्वाचे साधन होते. 18 व्या शतकात हिरे तयार करण्यासाठी या खाणी प्रसिद्ध होत्या. जागतिक बाजारपेठेसाठी हैदराबाद राज्य हे एकमेव हिरे खाणीचे व्यापार केंद्र होते. निजाम मीर उस्मान अली खान यांना विलासी जीवनशैलीची आवड होती. त्यांच्या वैयक्तिक खजिन्यात 40 कोटी पौंड (सुमारे 4,226 कोटी रुपये) किमतीचे दागिने आणि 10 कोटी पौंड (सुमारे 1,056 कोटी रुपये) किमतीचे सोने होते. त्यांच्याकडे हिऱ्यांचा विलक्षण संग्रह होता. यात दर्या-ए-नूर, नूर-उल-ऐन डायमंड, कोहिनूर, होप डायमंड, प्रिन्सी डायमंड, रीजेंट डायमंड आणि विटेल्सबॅक डायमंड यासारख्या प्रसिद्ध हिऱ्यांचा समावेश होता.
निजामाच्या सर्वात अद्वितीय रत्नांपैकी एक म्हणजे जेकब डायमंड. ज्याचा वापर ते पेपरवेट सारखे करायचे. 1947 मध्ये राणी एलिझाबेथ II हिच्या लग्नाच्या निमित्ताने निजामाने तिला लाखो किमतीचे हिऱ्यांचे दागिने भेट म्हणून दिले. यात एक मुकुट आणि मौल्यवान हिऱ्यांचा हार यांचा समावेश होता. या भेटवस्तू आजही राज घराण्यातील राणी वापरतात. हैदराबादचा निजाम हार म्हणून हा हार ओळखला जातो.
निजामाकडे इतकी प्रचंड संपत्ती असूनही ते फार कंजूष होते. हिरे, सोने, नीलम आणि पुष्कराज यांसारख्या मौल्यवान रत्नांची खाण होती. सोन्याच्या विटांनी भरलेले ट्रकच्या ट्रक त्यांच्या बागेत उभे असायचे. इतकी श्रीमंती असूनही प्रत्येक पैसा वाचवण्यासाठी ते नवनवीन मार्ग शोधायचे. राजेशाही कपड्यांऐवजी सुती कुर्ता, पायजमा आणि पायात साधी चप्पल घालत असत. त्यांच्या कंजूषपणाच्या अनेक कथा प्रसिद्ध आहेत.