नवी दिल्ली | 1 March 2024 : नितीन गडकरी यांना सातत्याने पंतप्रधान पदासाठी अत्यंत योग्य उमेदवार म्हणून चर्चा होतेच. त्यांच्यात आणि मोदी यांच्यात बेबनाव असल्याचा आणि मोदी गडकरी यांना अडचणीत आणण्याचा प्रयत्न करत असल्याची पण एक थेअरी मीडिया, सोशल मीडियातून मांडण्यात येते. त्यावर केंद्रीय रस्ते आणि वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी पु्न्हा त्यांच्या भावना व्यक्त केल्या आहेत. त्यांनी अशा प्रश्नांना बेधडक उत्तरं दिली. या सर्व वादाविषयी, पंतप्रधान पदाच्या शर्यतीविषयी त्यांनी असे मत व्यक्त केले.
काय प्रमोद महाजन यांच्याशी होता वाद?
एका खासगी वृत्त संकेतस्थळाला त्यांनी मुलाखत दिली. त्यावेळी त्यांना माजी भाजप नेते प्रमोद महाजन आणि त्यांच्यात संबंध कसे होते, अशा आशयाचा प्रश्न करण्यात आला. दोघांमध्ये बेबनाव होता का, अशी विचारणा करण्यात आली. त्यावर प्रमोद महाजन यांचा मला विरोध होता, असे म्हणणे, त्यांच्यावर अन्याय करण्यासारखे असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले. पहिले जे मंत्रिमंडळ तयार झाले. त्यात मी नव्हतो. अनेकांच्या माझ्याविषयीच्या भावना तीव्र होत्या. मी मंत्रिमंडळात असावे अशी अनेकांची अपेक्षा होता. पण तसं झालं नाही. दुसरे मंत्रिमंडळ, महाजन यांच्या देखरेखीखाली अस्तित्वात आले. त्यांच्या नेतृत्वात मला काम करण्याची संधी मिळाली. त्यांनी मला खूप प्रोत्साहन दिले. विरोधा सारखं काही उरलं नाही’. असं दोघांमधील नातं त्यांनी उलगडलं.
पंतप्रधानांनी बेबनावविषयी काय सांगितले
पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि नितीन गडकरी यांच्यात वाद आहे, असा प्रश्न त्यांना करण्यात आला. ‘मला दुःख होते, जेव्हा लोक माझे आणि पंतप्रधान यांच्यात भांडण होतील, असे वक्तव्य मीडियात करतात. मी भाजपचा कार्यकर्ता आहे. संघाचा स्वयंसेवक आहे. आम्ही पक्ष कार्यालयात ठळक अक्षरात लिहिले आहे, राष्ट्र सर्वप्रथम, नंतर पक्ष आणि त्यानंतर मी. आमच्यात कोणात विवाद उरलाच नाही ‘ अशी प्रतिक्रिया नितीन गडकरी यांनी दिली.
मी पंतप्रधानाच्या शर्यतीत नाही
पंतप्रधान नरेंद्र मोदी आमचे नेते आहेत. त्यांच्या नेतृत्वात देश चहुबाजूंनी प्रगती करत आहे. मी पंतप्रधान पदाच्या शर्यतीत नाही. मला तशी आकांक्षा नाही. यावरुन माझा कोणाशी वाद नाही, अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली. हे केवळ रिकामटेकड्या लोकांचे विश्वलेषण असल्याचा वऱ्हाडी टोला त्यांनी हाणला. मंत्री, माजी मंत्री होतो. मुख्यमंत्री हा माजी मुख्यमंत्री होतो. पण कार्यकर्ता हा कार्यकर्ताच असतो. तो माजी कार्यकर्ता होत नाही. मी भाजपचा कार्यकर्ता आहे. मी काम करु इच्छितो आणि काम करत राहतो.