नवी दिल्ली | 27 सप्टेंबर 2023 : राजधानी दिल्लीत एका आयएएस दाम्पत्याने आपल्या पाळीव कुत्र्याला फिरविण्यासाठी एथलीट स्टेडीएममधील खेळाडूंना बाहेर जाण्याचे फर्मान सोडले होते. गेल्यावर्षी घडलेल्या गंभीर प्रकाराची खूपच चर्चा झाली होती. या प्रकरणाची गंभीर दखल घेत सरकारने या दाम्पत्यापैकी एकाला सेवेतून सक्तीने निवृत्ती घ्यायला लावली आहे. कुत्रा फिरविण्याच्या घटनेनंतर आयएएस दाम्पत्याची अरुणाचल प्रदेश आणि लडाखमध्ये बदली करण्यात आली होती.
अरुणाचल प्रदेश सरकारमध्ये सेवेत असलेल्या एका महिला आयएएस अधिकाऱ्याला केंद्र सरकारने जबरदस्तीने निवृत्ती दिली आहे. या आयएएस अधिकाऱ्याचे नाव रिंकू दुग्गा असे आहे. रिंकू दुग्गा अरुणाचल प्रदेश, गोवा, मिझोरम आणि केंद्रशासित प्रदेश कॅडरच्या 1994 च्या बॅचच्या अधिकारी आहेत. त्यांचे पती संजीव खिरवार देखील 1994 बॅचचे आयएएस बॅचचे अधिकारी आहेत. या दोघांवर असा आरोप आहे की त्यांनी आपल्या पाळीव कुत्र्याला फिरविण्यासाठी दिल्लीच्या त्यागराज स्टेडीएमला रिकामे केले होते. त्यांच्या या कृतीमुळे पती संजीव खिरवार यांची लडाखला तर पत्नीची अरुणाचल प्रदेशात बदली करण्यात आली होती. दिल्ली सरकारच्या अखत्यारीत असलेल्या त्यागराज स्टेडीयमला 2010 मध्ये कॉमनवेल्थ गेम्ससाठी तयार करण्यात आले होते.
माहितीनूसार दुग्गा यांना मुलभूत नियम ( एफआर ) 56 ( जे ) , केंद्रीय सिव्हील सेवा ( सीसीएस ) पेंशन कायदा नियम 48, 1972 अंतर्गत सक्तीची निवृत्ती देण्यात आली आहे. हा निर्णय त्यांचा सर्व्हीस रेकॉर्ड पाहून घेण्यात आला आहे. सरकारला हा अधिकार आहे की कोणत्याही कर्मचाऱ्याला ते सक्तीने निवृत्त करु शकतात. सरकारी सूत्रांनी दिलेल्या माहीतीनूसार जर सार्वजनिक हिताचे प्रकरण असेल तर सरकार कर्मचाऱ्यांनी सक्तीची निवृत्ती घेऊ शकते.
हे प्रकरण मार्च 2022 आहे. दिल्लीच्या त्यागराज स्टेडीयममध्ये ट्रेनिंग देणाऱ्या एका कोचच्या म्हणण्यानूसार पूर्वी ते रात्री 8 किंवा 8.30 वाजेपर्यंत प्रशिक्षण घेत होते. परंतू नंतर त्यांना 7 वाजता ग्राऊंड खाली करण्याचे आदेश दिले. कारण आयएएस दाम्पत्याला त्यांच्या कुत्र्याला मैदानात फिरवायचे होते असे सूत्रांनी सांगितले. त्यामुळे क्रीडापटूचे प्रशिक्षण आणि प्रॅक्टीसमध्ये अडचणी निर्माण होऊ लागल्या. त्यानंतर एक फोटोही प्रसारमाध्यमात आला.