‘लोक माझी थट्टा करतात पण तरीही मी ती शॉल आम्हाला मिळालेल्या दुसऱ्या जीवनाची आठवण म्हणून जपून ठेवली आहे, 25 वर्षांपूर्वी पाकिस्तानी अतिरेक्यांनी हायजॅक केलेल्या इंडियन एअरलाईन्सच्या IC 814 विमानातून बचावलेल्या पूजा कटारिया आपला थरारक अनुभव सांगताना अजूनही शहारतात. आम्ही वाचलो हे आमचं भाग्य होतं आम्हाला दुसरा जन्मच मिळाला असे त्या म्हणाल्या…
पूजा कटारिया, वय 47 चंदीगडच्या मॉडर्न हाऊसिंग कॉप्लेक्समध्ये राहातात. 9 डिसेंबर 1999 रोजी त्यांचा विवाह झाला आणि त्या पतीसह आपल्या हनिमूनसाठी नेपाळला निघाल्या होत्या. त्यांच्या सह 26 नवपरिणित जोडपी या विमानातून भारतातून नेपाळच्या काठमांडूला हनीमूनला निघाली होती. याच इंडियन एअरलाईन्सच्या IC 814 विमानाचे 24 डिसेंबर 1999 रोजी अपहरण केले होते. हरकत-उल-मुजाहीदीन ग्रुपने या विमानाला अफगाणिस्तानच्या कंधार नेऊन ठेवत भारत सरकारकडे अतिरेक्यांना सोडण्याच्या मागण्या केल्या होत्या.
एका इंग्रजी वृत्तपत्राला मुलाखत देताना कटारिया म्हणाल्या की ते क्षण मी अजूनही विसरू शकत नाही,’आधी आम्हाला तर काय सुरु आहे हेच कळत नव्हतं.प्रवाशी अतिशय पॅनिक झाले होते.’
27 डिसेंबरला माझा बर्थ डे होता. 26 डिसेंबरला जेव्हा पब्लिक पॅनिक झाल्याचं पाहून त्यांच्या पैकी एका अतिरेक्यानं आम्हाला शांत करण्याचा प्रयत्न केला.मी त्याला विनंती केली की उद्या माझा बर्थ डे आहे.आम्हाला घरी जाऊ द्या…आम्ही निष्पाप आहोत’ त्याने स्वत:च्या अंगावरील शॉल काढली आणि म्हणाला, ही घ्या तुमच्या बर्थ डेचे गिफ्ट..पूजा कटारीया आपला थरारक अनुभव सांगत होत्या…अपहरणकर्ते एकमेकांशी कोड नेमने बोलत होते.
चीफ, डॉक्टर, बर्गर, भोला आणि शंकर अशा विचित्र नावाने ते एकमेकांना बोलवत होते. सात दिवसानंतर हे विमान अपहरण नाट्य संपले.भाजपा सरकारशी बोलणी करुन भारतीय तुरुंगात बंद असलेल्या तीन अतिरेक्यांना सोडण्याच्या बदल्यात या अतिरेक्यांनी एक मृत प्रवासी ( रुपिन कट्याल rupin katyal ) आणि इतर 179 प्रवाशांची सकुशल सुटका केली.
आम्हाला सोडण्यापूर्वी त्यांना सांगितले की आमच्या मागण्या पूर्ण झाल्या आहेत आम्ही तुम्हाला सोडत आहोत. तो अतिरेकी माझ्या जवळ आला आणि त्याने त्या शॉलवर काही लिहायचे आहे असे सांगितले मी अक्षरश: घाबरले. त्याने लिहीले की ‘ टु माय डिअरेस्ट सिस्टर एण्ड हर हॅण्डसम हजबंड…बर्गर 30/12/99’. या शॉलवरुन लोक माझी थट्टा करतात. परंतू शॉल मी अजूनही जपून ठेवलीय..आमच्या दुसऱ्या जन्माची आठवण म्हणून कटारिया व्यक्त होतात. त्याचे पती बिझनेसमन आहेत. आज त्यांना 23 वर्षांचा एक मुलगा आणि 19 वर्षांची एक मुलगी आहे. डिसेंबर 1999 नंतर पुढील दहा वर्षे त्यांनी भीतीमुळे विमानातून प्रवास केला नाही. आजही विमानात बसताना त्यांना या कटू आठवणी अंगावर शहारे आणतात….