मुंबई | 22 ऑक्टोबर 2023 : भारतीय हवामान खात्याने ( IMD ) अरबी समुद्रात कमी दाबाचा पट्टा तयार झाल्याने ‘तेज’ नावाचे चक्रीवादळ तयार होण्याचा इशारा दिला होता. परंतू आता ‘तेज’ बरोबरच बंगालच्या उपसागरात नवे ‘हमून’ नावाचे चक्रीवादळ तयार होत असल्याचा इशारा दिला आहे. साल 2018 नंतर प्रथमच अशी एकावेळी दोन चक्रीवादळं तयार होण्याची दुर्मिळ घटना होत असल्याचे म्हटले जात आहे. तेज चक्रीवादळ सुरुवातीला कमजोर म्हटलं जात होत, परंतू त्याचा वेग वाढला असून ताशी 140 वेगाने वारे वाहणार असल्याचा इशारा हवामान विभागाने दिला आहे. पाहा कुठल्या चक्री वादळाचा कुठल्या भागाला फटका बसणार आहे.
भारताच्या शेजारी अनेक वर्षांनी दोन चक्रीवादळं तयार झाली आहेत. पहिले चक्रीवादळ तेज नावाचे असून त्याचा आधी मुंबई आणि कोकण किनारपट्टीसह गुजरातला फटका बसणार असल्याचे म्हटले जात होते. परंतू आता त्याची दिशा बदलली असून ते आता येमन किंवा ओमान देशाच्या किनारी भागात धुमशान घालणार असल्याचा अंदाज आहे. तेजचे रविवारी वेगवान चक्रीवादळात रुपांतर झाले असून ताशी 140 च्या वेगाने ते 24 ऑक्टोबरच्या दुपारपर्यंत येमन किंवा ओमानला धडकणार असल्याचा अंदाज आहे.
दक्षिण-पश्चिम अरबी समुद्रातील तेज चक्रीवादळाचं स्वरुप भीषण झाले आहे. दक्षिणपूर्व आणि दक्षिणपश्चिम अरबी समुद्रातील कमी दाबाच्या पट्ट्याचे रुपांतर तेज चक्रीवादळात झाले आहे. हे वादळ हवामान विभागाच्या माहितीनूसार ओमानचा दक्षिण किनारपट्टी आणि येमेनच्या जवळ धडकणार आहे.
IMD चे ट्वीट येथे पाहा –
VSCS Tej lay centered at 0230 IST of 22nd Oct over SW Arabian Sea about 260 km ESE of Socotra (Yemen), 630 km SSE of Salalah (Oman), and 650 km SE of Al Ghaidah (Yemen). Very likely to intensify further into an Extremely Severe Cyclonic Storm in the forenoon of 22nd Oct. pic.twitter.com/Vs9KVhxTqX
— India Meteorological Department (@Indiametdept) October 22, 2023
तेजच्या निर्मितीनंतर दक्षिण-पूर्व बंगालच्या उपसागरात कमी दाबाच्या पट्ट्यामुळे ‘हमून’ चक्रीवादळ तयार झाले असून ते आंध्र प्रदेशाच्या किनारपट्टीकडे सरकत आहे. शुक्रवारी आंध्रप्रदेश हवामान खात्याने सांगितले की दक्षिण-पश्चिम आणि दक्षिण-पूर्व बंगाल सागरात हा कमी दाबाचा पट्टा तयार झाला आहे. या दोन्ही चक्रीवादळांचा मोठा प्रभाव भारतावर पडणार नसला तरी ओदिशा आणि बंगालमध्ये पाऊस होऊ शकतो. जर ‘हमून’ चक्रीवादळाच्या दिशेत बदल झाला तर तामिळनाडूच्या चेन्नई किनारपट्टीवर वातावरणात बदल होईल. तापमानात घट होईल. दरम्यान ‘तेज’ चक्रीवादळाचा गुजरातच्या किनारपट्टीला काही धोका नसल्याचे तेथील रिलीफ कमिशनरने स्पष्ट केले आहे.