नवी दिल्ली : वडिलांच्या संपत्तीवर कुणाचा आणि किती हक्क यावरुन नेहमीच वाद होतात. अनेकदा हे वाद अगदी न्यायालयापर्यंत पोहचतात. अशावेळी न्यायालये काय निवाडा देतात यावर अनेक गोष्टी ठरतात. अशाच एका खटल्यावर सुनावणी करताना मागील वर्षी सर्वोच्च न्यायालयाने वडिलांच्या संपत्तीवर ऐतिहासिक निकाल दिला. याप्रमाणे वडिलांच्या संपत्तीवर जितका मुलाचा हक्क आहे तितकाच मुलींचाही हक्क आहे. विशेष म्हणजे या निकालाने हिंदू वारस कायदा (दुरुस्ती) 2005 या कायद्याची अंमलबजावणी होण्याआधी मृत्यू झालेल्या वडिलांच्या मुलींनाही हा संपत्तीचा अधिकार बहाल केला. त्यामुळे भारतातील पुरुषप्रधान संस्कृतीत मुलींच्या हक्काला कायदेशीर मान्यता मिळाली. अशाच पद्धतीने मुलींना आपले अधिकार देणाऱ्या भारतातील 10 कायद्यांचा हा खास आढावा (Important 10 legal provisions about property rights of daughter in India).
1. वडिलोपार्जित संपत्तीवर अधिकार
हिंदू संपत्ती कायद्यात दोन भाग आहेत. त्यात एक वडिलोपार्जित संपत्ती आणि दुसरी स्वअर्जित संपत्ती. आधी वडिलोपार्जित संपत्तीवर केवळ मुलांचा अधिकार होता. मात्र, हिंदू वारस कायदा (दुरुस्ती) 2005 कायद्यानुसार या वडिलोपार्जित संपत्तीत आता मुलांइतकाच मुलींचाही अधिकार आहे. वडिल आपल्या मनाप्रमाणे या संपत्तीचं वितरण करु शकत नाही, तसेच मुलीला संपत्ती देण्यास नकारही देऊ शकत नाही.
2. वडिलांची स्वकमाईच्या संपत्तीवरील कायदा
वडिलांनी स्वतः संपत्ती कमावली असेल तर यावर मुलींचा हक्क काहीसा कमकुवत आहे. वडिलांनी स्वतःच्या पैशातून जमीन खरेदी केली असेल, घर बांधलं असेल किंवा खरेदी केलं असेल तर ही संपत्ती कुणाला द्यायची याचा पूर्ण अधिकार वडिलांना आहे. त्यामुळे अशा संपत्तीत वडिलांनी मुलीला वाटा देण्यास नकार दिला तर यासाठी मुलींना कोणतेही कायदेशी संरक्षण नाहीये.
3. इच्छापत्र न लिहिताच वडिलांचा मृत्यू झाल्यास काय?
वडिलांनी जीवंतपणी आपल्या संपत्तीच्या वितरणाबाबत इच्छापत्र तयार केलं नाही आणि अशातच त्यांचा मृत्यू झाला, तर त्यांच्या सर्व वारसदारांचा या संपत्तीवर समान अधिकार असतो. म्हणजेच अशा स्थितीत मुलींचाही या संपत्तीवर मुलांइतकाच अधिकार असतो.
4. मुलीचं लग्न झाल्यास काय?
आधी मुलींना केवळ कुटुंबाचा सदस्य मानलं जात होतं, मात्र संपत्तीमध्ये समान वारसाचे अधिकार नव्हते. मुलीचं लग्न झाल्यावर तर तिला माहेरच्या घरचा सदस्य देखील मानलं जात नव्हतं. मात्र, 2005 मध्ये कायद्यात झालेल्या दुरुस्तीनंतर आता मुलींना वडिलांच्या संपत्तीत समान वारस मानलं जातं. मुलीचं लग्न झालं तरी मुलीचा वडिलांच्या संपत्तीवरील अधिकार आबाधित राहतो.
5. मुलीचा जन्म 2005 पूर्वीच असेल आणि वडिलांचा मृत्यू झाला असल्यास काय?
हिंदू वारस कायद्यानुसार (दुरुस्ती) 2005 मुलीचा जन्म हा कायदा लागू होण्याआधी झालेला असू अथवा नंतर याने काहीही फरक पडत नाही. वडिलांच्या संपत्तीत मुलींचा मुलांइतकाच समान अधिकार असेल. मग ही संपत्ती वडिलोपार्जित असोकी स्वकमाईची असो. मात्र, वडिलांचा मृत्यू हा कायदा लागू होण्याआधी झाला असेल तर मात्र अशा मुलींना वडिलांच्या संपत्तीवर अधिकार सांगता येणार नाही. त्यांच्या संपत्तीचं वाटप वडिलांच्या इच्छापत्रानुसारच होईल.
6. भावासोबत सामाईक गृह कर्ज घ्यावं की नको?
भाऊ आणि बहिण सामाईकपणे घरासाठी कर्ज घेऊ शकतात. मात्र, त्याआधी काही गोष्टींची काळजी घेण्याचा सल्ला जाणकार देतात. याप्रमाणे बहिणीने कर्जात भावासोबत वाटेकरु होण्याआधी घराच्या मालकीत कागदपत्रांवर भावासोबत आपलंही नाव आहे की नाही याची खातरजमा करावी.
7. नवऱ्याचा पगार माहिती करुन घेण्याचा बायकोला पूर्ण अधिकार
पत्नीला आपल्या पतीच्या पगाराची माहिती घेण्याचा पूर्ण अधिकार आहे. विशेषतः पोटगी मिळवण्याच्या उद्देशाने ही माहिती पतीला द्यावी लागते. पत्नी ही माहिती माहिती अधिकार कायद्यांतर्गत देखील मागू शकते. मध्य प्रदेश उच्च न्यायालयाने 2018 मध्ये दिलेल्या निकालानुसार पत्नीला पतीच्या पगाराची पूर्ण माहिती मिळवण्याचा पूर्ण अधिकार आहे.
8. अनुकंपा तत्वावर वडिलांच्या जागेवर मुलांप्रमाणे मुलींनाही नोकरीचा अधिकार
नोकरीवर असतानाच वडिलांचा मृत्यू झाल्यास कोणत्याही संस्था अथवा कंपनीत अनुकंपा तत्वावर मुलांप्रमाणेच मुलींनाही नोकरीचा अधिकार आहे. याबाबत देशभरात अनेक उच्च न्यायालयांनी विविध खटल्यांवर निवाडा देताना ही गोष्ट स्पष्ट केलेली आहे. केवळ मुलगी विवाहित आहे किंवा अविवाहित आहे या मुद्द्यावर तिला अनुकंपा नोकरीचा अधिकार नाकारता येणार नाही. याबाबत विलासपूर उच्च न्यायालय, छत्तीसगड उच्च न्यायालय आणि मद्रास उच्च न्यायालयाने महत्त्वाचे निर्णय दिलेले आहेत.
9. पत्नी आणि मुलीच्या संमतीशिवाय वडिल मुलाला संपत्ती भेट देऊ शकतात
वडिलांनी स्वकमाईतून मिळवलेली संपत्ती वडिल आपली पत्नी किंवा मुलीची संमती न घेताच मुलाला भेट देऊ शकता किंवा त्याच्या नावावर करु शकतात. मात्र, पत्नीला घराबाहेर काढलेलं असेल अशा स्थितीत पत्नी याला आव्हान देऊ शकते. तसेच पोटगीची मागणी करु शकते. मुलगी देखील वडिलांच्या या निर्णयाला कायदेशीर पातळीवर आव्हान देऊ शकते.
10. पतीबाबतचे हक्क
लग्नानंतर पतीच्या संपत्तीत पत्नीला कायदेशीर हक्क नाही. मात्र, पतीच्या आर्थिक स्थितीनुसार पत्नी पोटगीची मागणी करु शकते. त्याचा तिला कायदेशीर अधिकार आहे.
हेही वाचा :
अब्जाधीश…. छत्रपती उदयनराजे भोसलेंची संपत्ती किती?
सुजय विखे पाटलांची संपत्ती किती?
पाच वर्षात राजू शेट्टींची संपत्ती दुप्पट, पाहा संपूर्ण तपशील
प्रकाश आंबेडकर यांची मालमत्ता किती? उत्पन्नाचे साधन काय?
व्हिडीओ पाहा :
Important 10 legal provisions about property rights of daughter in India