नवी दिल्ली : काँग्रेसच्या (Congress) गोटातून एक मोठी बातमी समोर आली आहे. काँग्रेस नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी मोदी आडनावावरुन केलेल्या वादग्रस्त वक्तव्याप्रकरणी त्यांना सुरत कोर्टाने दोन वर्षाची शिक्षा सुनावली. त्यानंतर त्यांची थेट खासदारकी रद्द करण्यात आली. राहुल गांधी यांच्यासाठी हा मोठा धक्का आहे. फक्त राहुल गांधीच नाही तर संपूर्ण काँग्रेससाठी हा धक्का आहे. पण तरीही राहुल गांधी मागे हटायला तयार नाहीत. याउलट राहुल गांधी यांनी भाजपविरोधातील राजकीय लढाई आणखी तीव्र करण्याचं ठरवलं आहे. त्यासाठी त्यांनी मोठा निर्णय घेतला आहे. याबाबत दिल्लीतून काँग्रेसच्या गोटातून मोठी बातमी समोर आली आहे.
निवडणूक आयोगाकडून कर्नाटक विधानसभा निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे. या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय घडामोडींना प्रचंड वेग येण्याची शक्यता आहे. या निवडणुकीसाठी प्रत्येक पक्ष चांगलाच कामाला लागला आहे. विशेष म्हणजे याच निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मध्यंतरी महाराष्ट्र-कर्नाटक सीमावादाचा मुद्दा चांगलाच तापला होता. पण केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी मध्यस्थी केल्याने हा वाद मिटला. या सगळ्या घडामोडींनंतर आज अखेर कर्नाटक विधानसभेची निवडणूक जाहीर झालीय.
या निवडणुकीच्या प्रचाराच्या पार्श्वभूमीवर राहुल गांधी भाजपला डिवचण्याची संधी सोडणार नाहीय. कारण राहुल गांधी यांनी भाजपला डिवचण्यासाठी एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. राहुल गांधी कर्नाटक विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रचारासाठी राज्यात दाखल होणार आहेत. राहुल गांधी 5 एप्रिलला कर्नाटक दौऱ्यावर येणार आहेत. ते 5 एप्रिलपासून कर्नाटक विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराला शुभारंभ करणार आहेत.
विशेष म्हणजे राहुल गांधी यांनी मोदी आडनावाबद्दल ज्या मतदारसंघात वादग्रस्त वक्तव्य केलं होतं त्याच मतदारसंघातून ते प्रचाराला सुरुवात करणार आहेत. सत्यमेव जयते असे प्रचार सभेचं नाव असणार आहे. राहुल गांधी यांनी 2019 साली कोलारमध्ये केलेल्या भाषणामुळे त्यांना कोर्टाने दोषी ठरवून दोन वर्षांची शिक्षा सुनावली आहे. त्यांनी कोलारमध्ये मोदी आडनावाबद्दल वादग्रस्त विधान केलं होतं. त्यानंतर त्यांची खासदारकी रद्द करण्यात आली आहे. या सगळ्या घडामोडींनतर राहुल गांधी आता कोलारमध्ये काय बोलणार? याकडे महाराष्ट्राचं लक्ष असणार आहे.
निवडणूक आयोगाने जाहीर केलेल्या निवडणूक कार्यक्रमानुसार, कर्नाटकात 10 मे रोजी मतदान होणार आहे. तर 13 मे रोजी निवडणुकीचा निकाल लागणार आहे. निवडणूक आयोगाने आज पत्रकार परिषद घेऊन याबाबत माहिती दिली. निवडणूक आयोगाने निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केल्यामुळे कर्नाटकात आजपासूनच आचारसंहिता लागू झाली आहे. विशेष म्हणजे कर्नाटक विधानसभेच्या 224 जागांसाठी एकाच टप्प्यात निवडणूक पार पडणार आहे.