नवी दिल्ली | 21 फेब्रुवारी 2024 : दक्षिण मुंबईचे माजी खासदार आणि माजी मंत्री मिलिंद देवरा यांनी कॉंग्रेसला सोडचिट्टी दिल्यानंतर कॉंग्रेसचे मराठवाड्यातील दिग्गज नेते अशोकराव चव्हाण यांच्या भाजपा प्रवेशाने कॉंग्रेसला मोठी गळती लागली आहे. आता आणखी काही जण कॉंग्रेसला सोडतील असे सुतोवाच भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी मागे केले होते. कॉंग्रेसचे आणखी एक दिग्गज नेते कमलनाथ तिवारी यांच्या भाजपा प्रवेशाच्या वावड्या उघड आहेत. परंतू कमलनाथ आणि त्यांचे खासदार पुत्र नकुलनाथ दोघांनी या प्रकरणी ‘नरो वा कुंजरो वा’ भूमिका घेतली आहे. यंदा भाजपासाठी एक-एक सीट महत्वाची असून मध्य प्रदेशच्या छिंदवाडा लोकसभेवर मोदी लाटेतही निवडून येणारे कमलनाथ यांच्या पाडघड्या घातल्या जात आहेत. आता पर्यंत किती माजी मुख्यमंत्र्यांनी कॉंग्रेसला सोडचिट्टी दिली पाहा..
महाराष्ट्राचे दोन वेळा मुख्यमंत्री झालेले नांदेडचे अशोक चव्हाण यांचे घराणे कॉंग्रेसचे एकदम निष्ठावान घराणे. त्यांचे पिताश्री शंकरराव चव्हाण हे कॉंग्रेसशी कायमच निष्ठावान राहीले. अशोक चव्हाण यांनी आदर्श घोटाळ्यात नाव आल्यानंतर त्यांनी कॉंग्रेस सोडून भाजपात जाण्याची केवळ औपचारिका राहीली होती. ती अखेर 12 फेब्रुवारी 2024 ला पूर्ण झाली.
आंध्रप्रदेशचे माजी मुख्यमंत्री किरण कुमार रेड्डी यांनी मार्च 2023 मध्ये कॉंग्रेसचा हात सोडला होता. आणि ते भाजपात सामील झाले. आपण कधी कॉंग्रेस सोडू जाऊ असे वाटले नव्हते असे त्यांनी म्हटले होते. वरिष्ठ नेतृत्वावर नाराज होऊन त्यांनी कॉंग्रेसला रामराम केला.
जम्मू-कश्मीरचे मुख्यमंत्री पद भूषविलेले दिग्गज नेते गुलाम नबी आझाद यांनी ऑगस्ट 2022 मध्ये कॉंग्रेसचा राजीनामा दिला. त्यानंतर त्यांनी स्वत:चा नवा पक्ष डेमोक्रेटीक प्रोग्रेसिव्ह आझाद पक्ष काढला. आझाद यांनी कॉंग्रेस पक्षात राहुल गांधी यांच्या नेतृत्वाला विरोध करीत कॉंग्रेसला सोडचिट्टी दिली होती.
गोव्याचे माजी मुख्यमंत्री दिगंबर कामत सप्टेंबर 2022 मध्ये,कॉंग्रेस पक्ष सोडला. त्यानंतर ते भाजपात गेले. कॉंग्रेस नेतृत्वावर त्यांनी नाराजी व्यक्त करीत गोव्याच्या हिताला विसरल्याचा आरोप केला होता.
गोव्याचे नेते आणि सहा मुख्यमंत्री राहीलेले प्रताप सिंह राणे यांनी मार्च 2022 मध्ये राजकारणातून संन्यास घेतला. त्यांचे पूत्र विश्वजीत राणे प्रमोद सावंत यांच्या नेतृत्वाखालील भाजपाच्या सरकारमध्ये मंत्री आहेत.तर सून देविया राणे भाजपाच्या आमदार आहेत. त्यांच्या मुलाने त्यांना कॉंग्रेस सोडण्यास दबाव आणल्याचे म्हटले जाते.
पंजाबचे दोनदा मुख्यमंत्री झालेले कॅप्टन अमरिंदर सिंह या ज्येष्ठ नेत्याने नोव्हेंबर 2021 मध्ये कॉंग्रेसला सोडले.त्यानंतर त्यांनी पंजाब लोक कॉंग्रेस पार्टीची स्थापना केली. तिला विधानसभा निवडणूकात अपयश आले.त्यानंतर त्यांनी त्यांचा पक्ष भाजपात विलीन केला. आता ते भाजपाच्या राष्ट्रीय कार्यकारिणीत आहेत. त्यांची मुलगी जय इंदर कौर राज्याच्या महिला मोर्चाच्या प्रमुख आहेत. त्यांना मुख्यमंत्री पदावरुन दूर केल्याने ते नाराज होते.
गोवाचे माजी मुख्यमंत्री कॉंग्रेसचे नेते लुइजिन्हो फलेरो यांनी सप्टेंबर 2021 मध्ये कॉंग्रेसचा हात सोडला. त्यानंतर ते तृणमुल कॉंग्रेसमध्ये सामील झाले.
कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री एसएम कृष्णा यांनी जानेवारी 2017 मध्ये कॉंग्रेसचा राजीनामा दिला आणि भाजपात गेले. त्यानंतर त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची स्तूती केली. त्यानंतर त्यांनी राजकारणातून संन्यास घेतला.
महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री असलेल्या नारायण राणे यांनी शिवसेना सोडून स्वत:चा पक्ष काढला. त्यानंतर त्यांनी कॉंग्रेसमध्ये प्रवेश केला. काँग्रेसने अशोकराव चव्हाण यांना मुख्यमंत्री करताच संतापलेल्या सोनिया गांधींवर त्यांच्या समक्ष टीका करीत सप्टेंबर 2017 मध्ये कॉंग्रेसचा राजीनामा दिला. त्यानंतर त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. सध्या ते केंद्रीय मंत्री आहेत.
उत्तराखंडचे माजी मुख्यमंत्री विजय बहुगुणा यांनी मे 2016 मध्ये काँग्रेसला सोडचिट्टी दिली. विजय बहुगुणांनी राज्यातील आठ माजी आमदार आणि त्यांचा मुलगा साकेत बहुगुणा यांना घेऊन भाजपात प्रवेश केला होता. सध्या विजय बहुगुणा यांचा मुलगा साकेत बहुगुणा उत्तराखंड भाजप सरकारमध्ये मंत्री आहे. विजय बहुगुणा त्यांचे कट्टर प्रतिस्पर्धी हरीश रावत यांना कॉंग्रेसने मुख्यमंत्री केल्याने नाराज होत काँग्रेस सोडली होती.
अरुणाचल प्रदेशचे मुख्यमंत्री पेमा खांडू यांनी सप्टेंबर 2016 मध्ये काँग्रेस सोडली आणि 43 आमदारांसह पीपल्स पार्टी ऑफ अरुणाचल प्रदेश ( पीपीए ) मध्ये सामील झाले. मात्र, नंतर त्यांनी भाजपामध्ये प्रवेश केला आणि ते राज्याचे मुख्यमंत्री आहेत. भाजपचा ‘विकास अजेंडा’ आवडल्याने कॉंग्रेसला सोडचिट्टी दिल्याचे त्यांनी म्हटले होते.
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि गोव्याचे माजी मुख्यमंत्री रवी नाईक यांनी दोनदा काँग्रेस सोडली. 2000 मध्ये त्यांनी पहिल्यांदा काँग्रेस सोडली आणि भाजपमध्ये प्रवेश केला. 2002 मध्ये ते काँग्रेसमध्ये पुन्हा परतले. त्यानंतर त्यांनी डिसेंबर 2021 मध्ये त्यांनी पुन्हा काँग्रेस सोडली आणि भाजपमध्ये प्रवेश केला.
उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री जगदंबिका पाल यांनी मार्च 2014 मध्ये काँग्रेसचा हात सोडला आणि भाजपात प्रवेश केला. जगदंबिका पाल यांनी 31 तास उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्रीपद भूषवले होते.
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते नारायण दत्त तिवारी म्हणजेच एन.डी. तिवारी हे तीनदा उत्तरप्रदेशचे तर एकदा उत्तराखंडचे मुख्यमंत्री होते. 53 वर्षे काँग्रेसमध्ये राहिल्यानंतर त्यांनी 2017 मध्ये कॉंग्रेसला सोडत भाजपमध्ये प्रवेश केला.