Vande Bharat Express | 14 मिनिटांत संपूर्ण ट्रेन चकाचक, वंदेभारत एक्सप्रेस सफाईतही सुपरफास्ट, बुलेट ट्रेनपासून घेतली प्रेरणा

| Updated on: Oct 01, 2023 | 1:23 PM

बुलेट ट्रेनच्या स्वच्छतेच्या संकल्पनेवर आधारीत वंदेभारत एक्सप्रेस स्वच्छ करण्याची योजना रेल्वे मंत्रालयाने रविवारपासून सुरु केली आहे.

Vande Bharat Express | 14 मिनिटांत संपूर्ण ट्रेन चकाचक, वंदेभारत एक्सप्रेस सफाईतही सुपरफास्ट, बुलेट ट्रेनपासून घेतली प्रेरणा
VANDE BHARAT EXPRESS
Image Credit source: socialmedia
Follow us on

नवी दिल्ली | 1 ऑक्टोबर 2023 : भारताची पहिली सेमी हायस्पीड ट्रेन वंदेभारत एक्सप्रेसच्या ( Vande Bharat Express cleaning ) स्वच्छतेसंदर्भात रेल्वेने मोठा निर्णय घेतला आहे. वंदेभारत एक्सप्रेसच्या संपूर्ण ट्रेनची स्वच्छता आता केवळ 14 मिनिटांत होणार आहे. रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी आज दिल्ली रेल्वे स्थानकावर या सुविधेचे उद्घाटन केले आहे. देशभरात एकाच वेळी वंदेभारत एक्सप्रेस स्वच्छतेच्या या अभिनव उपक्रमाचे उद्घाटन करण्यात आले. मध्य रेल्वेच्या छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसवर वंदेभारत एक्सप्रेसमध्येही हा उपक्रम राबविण्यात आला.

आधी वंदेभारत एक्सप्रेस स्वच्छतेसाठी तीन ते चार तास लागायचे. आता केवळ एका गाडीच्या स्वच्छतेसाठी केवळ 14 मिनिट पुरेसे ठरणार आहेत. वंदेभारतच्या प्रत्येक कोच साठी चार सफाई कर्मचाऱ्यांची टीम नियुक्त केली जाणार आहे. जपानच्या विख्यात बुलेट एक्सप्रेसच्या स्वच्छता प्रक्रियेतून प्रेरीत होऊन हा निर्णय भारतीय रेल्वेने घेतला आहे. भारतीय रेल्वेने स्वच्छता ही सेवा नावाने मोहिम सुरु केली आहे.

जपानच्या 7 मिनिटांचा चमत्कारावर आधारीत

रेल्वेच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले की आमची योजना 14 मिनिटात एका ट्रेनची स्वच्छता करण्याची आहे. सर्वच ट्रेनमध्ये ही योजना लागू करायची आहे. प्रत्येक वंदेभारतच्या कोचमध्ये एकूण चार कर्मचारी यासाठी तैनात असतील. या योजनेसाठी कर्मचाऱ्यांना एक महिन्याचे प्रशिक्षण देण्यात आले आहे. त्याचे मॉक ड्रील देखील करण्यात आले आहे.

रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी म्हटले आहे की एक अनोखी संकल्पना आहे. भारतात प्रथमच असा प्रयोग रेल्वेत होत आहे. जपानच्या बुलेट ट्रेनच्या 7 मिनिटांचा चमत्कार या संकल्पनेवर आधारीत ही योजना आहे. वेळेचे बंधन आणि स्वच्छतेचा दर्जा सुधारण्यासाठी ही योजना आणण्यात आली आहे.