आसाम | 26 ऑगस्ट 2023 : एकीकडे मुलांना खेळायला मैदान नाही, जागा नाही असं रडगाण गात बसण्यापेक्षा एका शहरात उड्डाण पुलाखाली चक्क बॅडमिंटनचं कोर्ट तयार करण्यात आले आहे. आसामच्या जोरहाट शहरात हे अनोखे बॅडमिंटन कोर्ट तयार करण्यात आळे आहे. आसाम बॅडमिंटन असोसिएशनचे सचिव दिगंता बुरागोहेन यांनी म्हटले आहे की स्थानिक व्यवसायिकाच्या मदतीने हे अनेक सुविधायुक्त सिंथेटिक कोर्ट तयार करण्यात आले आहे.
आसामच्या जोरहाट शहरात एका फ्लायओव्हरच्या खाली हे अनोखे बॅडमिंटन कोर्ट तयार करण्यात आले आहे. या कोर्टच्या एका बाजूच्या भिंतीवर ऑलिम्पिक पदक विजेत्या बॅडमिंटनपटू सायना नेहवाल हीच्यासह देशातील स्टार बॅडमिंटनपटूची चित्रे चितारली आहेत. या बॅडमिंटन कोर्टच्याकडेला खेळाडू, प्रशिक्षक तसचे इतरांसाठी बसायला खुर्च्या ठेवल्या आहेत. शटल बाहेर जाऊ नये यासाठी तसेच सुरक्षेसाठी कोर्टच्या कडेला तारांच्या जाळ्याही लावल्या आहेत.
आसम बॅडमिंटन असोसिएशनचे ( एबीए ) सचिव दिगंता बुरागोहेन यांनी याबाबत माहीती देताना सांगितले की सार्वजनिक जागेचा वापर अशा प्रकारे कल्पकतेने करण्यात आला आहे. त्यामुळे तरुणांना खेळण्यासाठी जागा उपलब्ध झाली आहे. जोरहाट बॅडमिंटन असोसिएशन या ठिकाणाची देखभाल करणार आहे. हे कोर्ट ठराविक फि भरून सदस्यांना खेळण्यासाठी वापरता येणार असून लवकरच ते सुरु होणार आहे.
उड्डाणपुलाखालील मोकळ्या जागेचा वापर इतर खेळांसाठीही करण्याची योजना आहे. उड्डाणपुलाखालील इतर ठिकाणे बॅडमिंटन खेळाला लागणाऱ्या जागे इतकी मोठी नाहीत. परंतु त्यांचा वापर बुद्धीबळ सारख्या इतर खेळांना प्रोत्साहन देण्यासाठी केला जाऊ शकतो, ज्यांना कमी जागा लागत असते. त्यामुळे पुलाखाली जागा इतर खेळांसाठी उपलब्ध करण्याचा विचार सुरु असल्याचे दिगंता बुरागोहेन यांनी सांगितले.