नवी दिल्ली : केंद्रीय मंत्री नितीन गडकरी (Nitin Gadkar) यांनी गुरुवारी सांगितले की, पुढील 5 वर्षात भारतातील पायाभूत सुविधा अमेरिका आणि युरोपसारख्या होतील. नव्या भारताच्या निर्मितीसाठी आम्ही एक भक्कम पाया तयार केला आहे, ज्यामध्ये आम्ही मागील 5 वर्षात 17 लाख कोटी रुपयांचे प्रकल्प सुरू केले आहेत. गडकरी म्हणाले की, देशातील विकासाच्या बाबतीत मागासलेला भाग, पूर्वोत्तर आणि सीमाभागांचा विकास हे सरकारचे सर्वात मोठे लक्ष्य आहे. (In five years, Indian roads will be like Europe-America; Nitin Gadkari’s assurance)
टाईम्स नेटवर्क इंडिया इकॉनॉमिक कॉन्क्लेव्हमध्ये गडकरी म्हणाले, मी तुम्हाला वचन देतो की येत्या 5 वर्षात भारतातील संपूर्ण पायाभूत सुविधा बदलतील आणि त्या अमेरिका आणि युरोपसारख्या होतील. ग्रीन एक्सप्रेसवे कॉरीडोरचं नेकवर्क पूर्णपणे सज्ज आहे. ज्यात दिल्ली मुंबई एक्सप्रेस वे आणि 30 किमी द्वारका द्रुतगती मार्गाचा समावेश आहे.
या सर्व प्रकल्पांवर 10,000 कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे आणि हा अभियांत्रिकीचा एक अप्रतिम नमुना असेल, ज्यामुळे दिल्ली बॉर्डर सिंगापूरसारखी दिसेल. ते म्हणाले की, सीमेवरील रस्ते बांधण्याचे 90 टक्के काम पूर्ण झाले आहे. या ठिकाणी ऑस्ट्रेलिया टनेल मॉडेल पद्धतीने काम केले जात आहे जेथे तापमान 8 अंश सेल्सिअस इतकं आहे.
गडकरी म्हणाले की, कैलास मानसरोवर प्रकल्पाचे कामही वेगाने सुरू आहे, यामुळे आगामी काळात कैलास मानसरोवर दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांना कमी प्रवास करावा लागेल. त्याचबरोबर चार धाम प्रकल्पावरही काम सुरू आहे. म्हणजेच आता कोणत्याही मोसमात गंगोत्री, बद्रीनाथ आणि केदारनाथ प्रवास करता येईल. यावर एकूण 12000 कोटींचा खर्च होत आहे.
नितीन गडकरी पुढे म्हणाले की, त्यांचे लक्ष जागतिक स्तरावरील पायाभूत सुविधांवर आहे, जेथे दररोज 35 कि.मी. रस्ता तयार होत आहे आणि गेल्या 358 दिवसांपासून ते निरंतर सुरु आहे. जर आपण त्याच वेगाने पुढे जात राहिलो तर येत्या काळात दिवसाला 35 ऐवजी 40 किमी रस्त्यांचे बांधकाम होईल.
अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या माध्यमातून ग्रीन एक्सप्रेस हायवेच्या (Green Express Highways) बांधकामावर सरकार सात लाख कोटी रुपये खर्च करीत आहे. केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी बुधवारी याबाबतची माहिती दिली. यावेळी ते म्हणाले की, या Green Express Highways मुळे देशातील परिवहन अधिक स्मार्ट होईल. त्याचबरोबर प्रदूषणाची पातळी कमी होण्यास मदत होईल. पीएचडी चेंबर ऑफ कॉमर्सने डिजिटल पद्धतीने आयोजित केलेल्या कार्यक्रमात गडकरी बोलत होते.
परिवहन मंत्री म्हणाले की, पंतप्रधानांनी राष्ट्रीय पायाभूत सुविधा पाईपलाईन अंतर्गत 111 लाख कोटी रुपयांच्या गुंतवणूकीचे लक्ष्य ठेवले आहे आणि हरित दृष्टीकोन स्वीकारून सरकार ‘पर्यावरणाला हानी न पोहोचवता विकास करण्याचा प्रयत्न करीत आहे. नितीन गडकरी म्हणाले की, 22 ग्रीन हायवे कॉरिडोरपैकी दिल्ली-मुंबई द्रुतगती मार्गावर दोन महानगरांदरम्यान कारने प्रवास करण्याचा वेळ कमी केला जाईल. हा प्रवास 12 तासांमध्ये होऊ शकेल, सध्या हा प्रवास पूर्ण करण्यासाठी 40 तास लागतात.
गडकरी म्हणाले की, या 1,300 कि.मी. प्रकल्पातील 60 टक्के काम पूर्ण झाले आहे. उर्वरित काम एका वर्षात पूर्ण करण्याचा आम्ही प्रयत्न करीत आहोत. ते म्हणाले की, दिल्ली-मुंबई एक्सप्रेस वे प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्यात आठ लेन असतील. दुसर्या टप्प्यात त्यांची संख्या 12 होईल. त्याअंतर्गत स्वतंत्र इलेक्ट्रिक हायवे लेनही बांधली जाईल. ते म्हणाले की, एका वर्षात इलेक्ट्रिक ट्रकदेखील उपलब्ध होतील.
नितीन गडकरी म्हणाले की, दिल्ली-अमृतसर-कटरा प्रकल्पाचे काम दोन ते तीन महिन्यांत सुरू होईल. याशिवाय पाइपलाईनमधील 4,063 कोटी रुपयांचा दिल्ली-फरीदाबाद-सोहना एक्सप्रेस महामार्ग आणि अहमदाबाद-ढोलेरा महामार्ग प्रकल्प 4,000 कोटी रुपयांचा आहे, तोदेखील सादर करण्यात आला आहे.
इतर बातम्या
Green Highways वर सरकार 7 लाख कोटी खर्च करणार, नितीन गडकरींचं सॉलिड प्लॅनिंग
तुमची आवडती कार लवकर बुक करा, 1 एप्रिलपासून ‘या’ गाड्या महागणार
कार्सपाठोपाठ बाईक-स्कूटरदेखील महागणार, हिरो मोटोकॉर्पकडून Price Hike ची घोषणा
(In five years, Indian roads will be like Europe-America; Nitin Gadkari’s assurance)